ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय हवाई दलात महिला अधिकाऱ्यांची संख्या 1 सप्टेंबर 2020 रोजी 1875 इतकी आहे. यापैकी 10 महिला अधिकारी लढाऊ वैमानिक तर 18 महिला अधिकारी नेव्हिगेटर आहेत, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज राज्यसभेत डॉ. विकास महात्मे यांना लेखी उत्तरात दिली.

ते म्हणाले, लढाऊ पायलट म्हणून महिला अधिकाऱ्यांना समाविष्ट करण्याबाबत मंत्रालयाकडे भारतीय हवाई दलाकडून प्रस्ताव आला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या मंजुरीनंतर हवाई दलाने 2016,मध्ये ‘लढाऊ वैमानिक म्हणून महिला एसएससी अधिकाऱ्यांचा समावेश’ ही योजना सुरु केली . या योजनेअंतर्गत आतापर्यंत 10 महिला लढाऊ पायलट कार्यरत आहेत.
निहित धोरणानुसार सामरिक गरजा आणि परिचालन आवश्यकतेनुसार महिला लढाऊ वैमानिक हवाई दलात समाविष्ट आणि तैनात केले जातात, ज्याचा वेळोवेळी आढावा घेतला जातो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.









