प्रतिनिधी /बेळगाव
भक्ती आणि नीतीच्या मुल्याधि÷ित मार्गावर वाटचाल करत असताना संतांना जी अनुभूती आली. ते संतसाहित्य आहे. काळ कितीही बदलला तरी संत साहित्य जुने होत नाही. भारतीय संतसाहित्य हा अनुभूतीचा आविष्कार आहे, असे प्रतिपादन डॉ. रविंद्र बेंबरे (नांदेड) यांनी केले.
सरस्वती वाचनालय आयोजित बसवेश्वर व्याख्यानमालेत ‘अस्वस्थ वर्तमानात भारतीय संत साहित्य’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आरटीओ अधिकारी शिवानंद मगदूम होते. पाहुण्यांचे स्वागत वाचनालयाच्या अध्यक्षा प्रा. स्वरुपा इनामदार यांनी केले. यावेळी मधुसुदन किनारी, सोमशेखर नाकाडी, प्रज्ञा जोशी यांचा कार्यक्रमास बहुमोल सहकार्य मिळाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. शिवाजी कागणीकर यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. बेंबरे म्हणाले कोरोनामुळे जी गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याला सामोरे जाण्याची शिकवण संत साहित्यात आहे. ‘आलिया भागोसी असावे सादर आणि ठेविले अनंते तैसेची रहावे’, या अभगात तुकारामांचे मनोवैज्ञानिक विचार अधोरेखित होतात. महात्मा बसवेश्वर सांगतात की, जो डगमगतो तो संकटात बुडतो, ज्याचे धैर्य ढळत नाही, त्यांच्यावर उपचार होतो, भीतीमुळे मनाची स्थिरता कमी होऊन रोग प्रतिकारक क्षमता कमी होते. मनाची अस्थिरता हेच दुःखाचे कारण आहे. माणूस जसा विचार करतो. तसे घडत असतो. सतत नकारात्मक विचारातून संशय बळावतो, असे ते म्हणाले.
समाजातील संवाद हरवला असून मोबाईलमुळे जग मुठीत आल्यासारखे वाटत असले तरी घरातील माणसे दुरावत आहेत. सुख, दुःख व्यक्त करायलाही जागा नसल्याने संवेदना बधीर झाल्याचे डॉ. बेंबरे यांनी सांगितले. व्यासपीठावर डॉ. रवींद्र बेंबरे, आर. एम. करडीगुद्दी, शिवानंद मगदूम, स्वरुपा इनामदार, एस. जी. आरबोळे उपस्थित होते. शिवानंद मगदूम यांनी अध्यक्षीय समारोप केला. प्रा. आर. एम. करडीगुद्दी यांनी आभार मानले.









