षटकांची गती न राखल्याबद्दल आयसीसीची कारवाई
वृत्तसंस्था/ दुबई
न्यूझीलंडविरुद्ध माऊंड माँगनुई येथे झालेल्या पाचव्या व शेवटच्या टी-20 सामन्यात षटकांची गती कमी राखल्याबद्दल भारतीय संघावर आयसीसीने दंडात्मक कारवाई केली आहे. या सामन्यात निर्धारित वेळेत एक षटक कमी टाकल्याने भारताला सामना मानधनातील 20 टक्के रकमेचा दंड करण्यात आला आहे.
आयसीसी ईलाईट पॅनेलचे सामनाधिकारी यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी ही दंडात्मक कारवाई केली आहे. ‘आयसीसी आचारसंहितेच्या 2.22 कलमानुसार षटकांच्या गतीसंदर्भात अपराध घडल्यास एका षटकास 20 टक्के दंड करण्यात येतो. भारताने निर्धारित वेळेत एक षटक कमी टाकल्याचे आढळून आले आहे,’ असे आयसीसीने निवेदनात म्हटले आहे. या सामन्यात रोहित शर्माने हंगामी कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्याने गुन्हा व दंडात्मक कारवाई दोन्ही मान्य केले असल्याने त्याबाबत सुनावणी घेण्यात आली नाही.
या संदर्भात मैदानी पंच ख्रिस ब्राऊन, शॉन हेग व तिसरे पंच ऍश्ले मेहरोत्रा यांनी अहवाल दिला होता. भारताने हा सामना 7 धावांनी जिंकून मालिका 5-0 अशी एकतर्फी जिंकली. भारतीय संघाला सलग दुसऱयांदा षटकांची गती न राखल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. चौथ्या सामन्यातही भारताने दोन षटके कमी टाकल्याबद्दल त्यांच्यावर मानधनातील 40 टक्के रकमेचा दंड करण्यात आला होता.









