सेन्सेक्समध्ये 271 तर निफ्टीत 101 अंकांची घसरण
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील तिसऱया दिवशी बुधवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे. यामध्ये बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई सेन्सेक्स नवा विक्रम नेंदवत घसरणीसह बंद झाले आहेत. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या पतधोरण बैठकीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याचे पहावयास मिळाले आहे. दिग्गज कंपन्यांपैकी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसीसह एचडीएफसी बँक या समभागांमध्ये विक्री राहिल्याने घसरणीची नोंद करण्यात आली आहे.
दिवसभरातील कामगिरीमुळे बीएसई सेन्सेक्स 271.078 टक्क्यांनी घसरुन निर्देशांक 52,501.98 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजुला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 101.70 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 15,767.55 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांपैकी पॉवरग्रिडचे समभाग सर्वाधिक 2 टक्क्यांनी घसरुन नुकसानीत राहिले आहेत. यासोबतच इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन ऍण्ड टुब्रो, अल्ट्राटेक सिमेंट आणि बजाज फायनान्स घसरणीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये नेस्ले, एनटीपीसी, ओएनजीसी, बजाज फिनसर्व्ह, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि इन्फोसिसचे समभाग लाभात राहिले आहेत.
अन्य घडामोडींचा प्रभाव
तिसऱया दिवशीच्या सत्रात अमेरिकन फेडरल रिझर्व्ह(केंद्रीय बँक) यांची दोन दिवसांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. परंतु यातील निर्णय दिला नसल्याने गुंतवणूकदारांनी त्या अगोदरच सावध भूमिका घेतल्याचा नकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारांवर पडल्याचे पहावयास मिळाले आहे. आशियातील अन्य बाजारांमध्ये मिळताजुळता कल राहिला होता. तर शांघाय, हाँगकाँग आणि टोकीयो हे बाजार मात्र घसरणीत राहिले आहेत.









