चीनचा खोटारडेपणा जगासमोर आणण्याची कामगिरी
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
भारतीय वंशाच्या महिला पत्रकार मेघा राजगोपालन यांना पुलित्झर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पत्रकारिकतेच्या जगतातील हा सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. मेघा यांनी स्वतःच्या वृत्तअहवालांद्वारे चीनच्या डिटेंशन कॅम्पसचे सत्य जगासमोर आणले होते. उपग्रहीय छायाचित्रांचे विश्लेषण करून त्यांनी चीनने कशाप्रकारे लाखोंच्या संख्येत उइगूर मुस्लिमांना कैद करून ठेवले आहे हे सांगितले होते. पुलित्झर पुरस्कारांचे वितरण यापूर्वी 19 एप्रिल रोजी होणार होते. पण सोहळा 11 जूनपर्यंत लांबणीवर टाकण्यात आला होता. हा पुरस्कार 1917 सालापासून प्रदान केला जात आहे.
मेघासोबत इंटरनेट मीडिया बजफीड न्यूजच्या दोन पत्रकारांनही पुलित्झर पुरस्कार देण्यात आला आहे. भारतीय वंशाचे पत्रकार नील बेदी यांना स्थानिक वृत्तांकन शेणीत पुलित्झर पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांनी फ्लोरिडात सरकारी अधिकाऱयांकडून होणाऱया मुलांच्या तस्करीवरून टाम्पा बे टाइम्ससाठी शोधपत्रकारिता करत स्टोरी प्रसिद्ध केली होती.
फ्लॉयड हत्येचे चित्रण
अमेरिकेच्या डार्नेला प्रेजियर हिला पुलित्झर स्पेशल सायटेशन देण्यात आले आहे. कृष्णवर्णीय अमेरिकन जॉर्ज फ्लॉयडच्या हत्येच्या घटनेचे तिने मिनेसोटामध्ये चित्रण केले होते. या घटनेनंतर अमेरिकाच नव्हे तर जगभरात वंशद्वेषाच्या विरोधात तीव्र निदर्शने झाली होती.
महत्त्वाच्या पुरस्कारांचे मानकरी
पब्लिक सर्व्हिस- द न्यूयॉर्क टाइम्स
बेकिंग न्यूज रिपोर्टिंग- स्टार ट्रिब्यून
इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंग- बोस्टन ग्लोबचे 5 पत्रकार
एक्सप्लेनरी रिपोर्टिंग- द अटलांटिकचे एड यंग अन् रॉयटर्सचे 5 पत्रकार
लोकल रिपोर्टिंग- टाम्पा बे टाइम्सचे दोन पत्रकार









