ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय लष्कराच्या ताफ्यात लवकरच ‘ध्रुवास्त्र’ दाखल होणार आहे. या क्षेपणास्राचा वापर भारतीय लष्कराकडील ध्रुव हेलिकॉप्टरसोबत केला जाणार आहे.
भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराला अधिकाधिक शस्त्रसज्ज करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ‘ध्रुवास्त्र’ हे पूर्णपणे मेड इन इंडिया असून, क्षणार्धात शत्रू सैन्याच्या चिंधड्या उडवण्याची क्षमता या क्षेपणास्रामध्ये आहे. लष्कराच्या ध्रुव हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या क्षेपणास्त्राचा शत्रूविरोधात वापर केला जाणार आहे.
ओडिशा येथील बालासोरमध्ये 15 आणि 16 जुलैला या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. आता हे क्षेपणास्त्र भारतीय लष्कराच्या ताब्यात सोपविण्यात येणार आहे. बालासोरमध्ये हेलिकॉप्टरशिवाय या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. आता हेलिकॉप्टरच्या माध्यमातून याच्या चाचण्या होतील.
दरम्यान, भारत-चीन सीमेवरील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून भारतीय लष्कराला ‘भारत’ हा ड्रोन देण्यात आला आहे. पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषा तसेच उंचीवरील भाग आणि पर्वतीय भागांमध्ये लक्ष ठेवण्यासाठी हा ड्रोन लष्कराला मदत करणार आहे.