ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय रेल्वेने चिनी कंपनीला सिग्नल आणि दूरसंचार कामासाठी दिलेले 471 कोटींचे कंत्राट रद्द केल्यानंतर चिनी कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात भारतीय रेल्वेविरोधात खटला दाखल केला आहे.
कानपूर ते मुगलसराय दरम्यान कॉरिडॉरच्या 417 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर सिग्नल आणि दूरसंचार कामासाठी बीजिंग नॅशनल रेल्वे रिसर्च अँड डिझाइन इन्स्टिट्यूट ऑफ सिग्नल अँड कम्युनिकेशन या कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. 2016 मध्ये 471 कोटी रुपयांना हे काम दिले होते. कंपनीने आतापर्यंत केवळ 20 टक्केच काम पूर्ण केले होते. अतिशय धीम्या गतीने हे काम सुरू असल्याने या वर्षी एप्रिल महिन्यात कंपनीला हे कंत्राट रद्द करण्यात येईल, याची कल्पना देण्यात आली होती.
दिलेल्या मुदतीत ही कंपनी काम करू न शकल्यामुळे या चिनी कंपनीला 14 दिवसांची नोटीस देऊन हे कंत्राट रद्द करण्यात आले. त्यानंतर खवळलेल्या चीनने भारतीय रेल्वेविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल केला.









