ऑनलाईन टीम / नागपूर :
भारतीय रेल्वेने पहिल्यांदाच 2.8 किमी लांबीची मालगाडी चालवून नवा इतिहास रचला आहे. या मालगाडीला 251 डबे होते. सुपर पायथन ‘शेषनाग’ असे या मालगाडीला नाव देण्यात आले आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी देखील ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.
भारतीय रेल्वेने चार मालगाड्यांना जोडून 2.8 किमी लांबीची मालगाडी तयार करून ती चालवण्याचा विक्रम केला. 251 डबे, व्हॅगन, 4 ब्रेक व्हॅन आणि 9 विद्युत लोको (इंजिन) या ट्रेनला जोडण्यात आले होते. छत्तीसगडमधील परमलकसा आणि दुर्ग या दोन स्टेशन दरम्यान ही ट्रेन चालवण्यात आली.
या मालगाडीने परमलकसा ते दुर्ग दरम्यानचे 22 किलोमीटरचे अंतर 45 मिनिटात पूर्ण केले. परमलकसा येथून ही ट्रेन गुरुवारी दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी सोडण्यात आली. ती 1 वाजून 5 मिनिटांनी दुर्गला पोहोचली. ही मालगाडी दुर्गहून पुढे बिलासपूर आणि तेथून कोरबापर्यंत ही गेली. भविष्यात युद्धजन्य परिस्थितीत अन्न धान्य तसेच आवश्यक साहित्य पोहचविण्यासाठी या ट्रेनचा वापर होऊ शकतो. त्याच पार्श्वभूमीवर ही ट्रायल घेण्यात आली.