येत्या 12 जानेवारी रोजी भारतात राष्ट्रीय युवा दिवस साजरा होत आहे. जगातील सर्व देशांमध्ये भारतात युवकांची संख्या सर्वात जास्त आहे. तरुण वयामध्ये उत्साह, जोम, ताकत, काहीतरी करून दाखवण्याची धडपड ही वयाच्या मानाने स्वाभाविक असते. जर या वयामध्ये व्यवस्थित मार्गदर्शन मिळाले तर उर्वरित आयुष्य यशस्वी होण्यास मदत होते आणि याउलट तारुण्याच्या मस्तीमध्ये व्यवस्थित मार्गदर्शन घेतले नाही तर उर्वरित आयुष्य वाया जाण्याची शक्मयता जास्त असते. बालपण आणि तारुण्यात मन हे स्पंजप्रमाणे असते. स्पंज ज्याप्रमाणे पाणी शोषून घेतो आणि पाणी शोषून घेताना पाणी गटारातील आहे की स्वच्छ आहे हा विचार करत नाही त्याचप्रमाणे बालपणी आणि तरुणपणी आपण ज्याची संगत करतो त्याप्रमाणे आपला स्वभाव बनतो. म्हणून आपली संगत कशी असावी हे फार महत्त्वाचे आहे. पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करण्याच्या आपल्या वृत्तीमुळे एकेकाळी सर्व जगाला मार्गदर्शन करणाऱया या वैदिक संस्कृतीचा ऱहास होत चालला आहे. पण आज पाश्चात्य राष्ट्रातील भोगवादी संस्कृतीला कंटाळून तेथील युवक भारतीय संस्कृतीकडे आकर्षित होत आहेत. भारतामध्ये श्रीकृष्ण आणि श्रीराम यांनी अवतार धारण केला. श्रीकृष्णांनी सर्व ज्ञानाचा राजा असलेला भगवद्गीता उपदेश या पुण्यभूमी भारतामध्येच केला. वेदव्यासांनी सर्व ज्ञानाचा सागर असलेले वेद याच भारतभूमीमध्ये लिहिले. आपल्या पूर्वजांनी बांधलेली वैदिक संस्कृतीची आध्यात्मिक केंद्रस्थाने पंढरपूर, द्वारका, जगन्नाथपुरी, तिरुपती, उडुपी, गुरुवायूर, मायापूर इत्यादी भव्य आणि आकर्षक मंदिरेही भारतातच आहेत. गंगा, यमुना, सरस्वती, कृष्णा, इंद्रायणी, कावेरी, गोदावरी, नर्मदा इत्यादी पवित्र नद्याही भारतातच वाहतात. रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निंबार्काचार्य, विष्णुस्वामी, शंकराचार्य, संत तुकाराममहाराज आणि अलीकडच्या काळात सर्व जगामध्ये वैदिक संस्कृतीचा प्रचार करणारे श्रील प्रभुपाद यासारखे महान आचार्यही भारतभूमीमध्येच अवतरित झाले. जगाच्या कल्याणासाठी त्यांनी वैदिक संस्कृतीचा स्वतःच्या जीवनामध्ये पालन करून प्रचार केला. दुर्दैवाने आजच्या पिढीला या महान परंपरेचा आणि वारशाचा विसर पडत चालला आहे.
भारतीयांनी विशेषतः युवकांनी या वैदिक संस्कृतीचे पालन केले पाहिजे आणि प्रचार केला पाहिजे कारण सर्व जग आज अंधकारामध्ये चाचपडत आहे आणि केवळ भारतीयांकडे सर्व जगाला शांती व सुख कसे प्राप्त करावे याची जाणीव करून देणारे सर्वोच्च ज्ञान भगवद्गीतेच्या रूपाने भारताकडे आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमध्ये एका सभेमध्ये अभिमानाने सांगितले की ‘माझ्याकडे सर्व जगाला देण्यासाठी भगवद्गीतेपेक्षा श्रे÷ काही नाही, आणि सर्व जगामध्ये भगवद्गीतेपेक्षा काही श्रे÷ काही घेण्यासारखे नाही.’ भारतीय युवकांनी याचा जरूर विचार करावा. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः । सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दु:खभाग्भवेत् । अर्थात सर्वजण सुखी राहोत, सर्वजण रोगमुक्त राहोत, सर्वांचे जीवन मंगलमय बनो. कोणीही दु:खाचे भागीदार न बनो, ही सर्वांचे कल्याण करणारी वैदिक प्रार्थना आहे. ही प्रार्थना प्रत्यक्षात कशी उतररावी याचे ज्ञान व अनुभव अनादी काळापासून भारताकडे आहे. सर्व जगामध्ये विज्ञान आणि आधुनिक प्रगतीच्या कितीही बढाया मारल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात वस्तुस्तिथी वर निर्देशित केलेल्या प्रार्थनेच्या विरुद्ध आपल्याला पहावयास मिळते. जगामध्ये रोगराई वाढत आहे विशेषतः तरुण अनेक शारीरिक आणि मानसिक आजारांनी ग्रस्त आहेत. सुखाचा कितीही गवगवा केला तरी सर्वजण दु:खाचाच अनुभव करीत आहेत. सर्वत्र खून, मारामाऱया, दरोडे, दंगे, बलात्कार, व्यसनाधीनता, अस्वच्छता इत्यादी अमंगलमय घटना दररोज घडताना आपण पाहतो व ऐकतो. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कारणाने दु:ख अनुभवतो आहे.
या सर्व घटनांचे मूळ कारण आहे आपण आपल्या पूर्वजांनी दिलेल्या गीता, भागवत ग्रंथावर आधारित जीवन पद्धतीचा त्याग केलेला आहे. तरुणांनी आपल्या पूर्वांजांचा देदीप्यमान इतिहास ज्याचे वर्णन महाभारत रामायण भागवतमध्ये केले आहे त्याचा अभ्यास करावा. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य आणि सुराज्य स्थापन करण्याची प्रेरणा त्यांच्या मातोश्री जिजाऊंनी या ग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या इतिहासातूनच दिली होती. आज जगाला या दिव्य आदर्शाची गरज आहे ही जाणीव भारतीय युवकांनी ठेवावी. संत तुकाराम महाराज एका अभंगातून तारुण्य कसे वाया जाते याचे वर्णन करताना सांगतात तारुण्याच्या मदे न मानी कोणासी । सदा मुसमुसी घुळी जैसा ।।1।। अटोनि विठोनी बांधला मुंडासा ।फिरतसे म्हैसा जनामधी ।।2।। हाती दीड पान वरती करी मान । नाही तो सन्मान भालियांसी ।।3।। श्वानाचिया परी हिंडे दारोदारी । पाहे नरनारी पापदृष्टी ।।4।। तुका म्हणे ऐसी थोर हानी झाली । करिता टवाळी जन्म गेला ।।5।। अर्थात तरुण तारुण्याच्या तंद्रीत कोणासही मानत नाही. बैलवळू जसा मस्तीने मुसमुसत असतो, त्याप्रमाणे तो सर्वकाळ मुसमुसत असतो. मुंडासे डोक्मयाला चोपून चापून घट्ट बांधतो आणि मस्तवाल रेडय़ाप्रमाणे समाजात मिरवत असतो. हातात पानविडय़ाचे दीड पान धरून ताठ मानेने चालतो. ज्ये÷ मंडळींना सन्मानाने नमस्कार करीत नाही, कुत्र्याप्रमाणे दारोदार हिंडतो आणि परस्त्रीकडे पापदृष्टीने पाहतो. असा तरुण दुसऱयाची टवाळी, निंदा करतो आणि त्यातच त्याचे आयुष्य वाया जाते आणि तारुण्याच्या मस्तीत परमार्थाची मोठी हानी होते. हा अभंग 16 व्या शतकातील आहे. आज तरुणपण वाया घालवण्याचे प्रकार बदलले पण परिस्थिती तीच आहे. आजचा तरुण मार्गदर्शनाअभावी व आदर्शाअभावी दिशाहीन झालेला आहे. केवळ पैसा व प्रति÷ा मिळवून इंदीय तृप्ती करणे हेच ध्येय आजच्या तरुणांपुढे आहे. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी अश्लील चित्रपट, नाटके, टीव्हीवरील अनेक मालिकांनी जीवनमूल्यांचा पूर्णपणे ऱहास करून टाकला आहे. याचा परिणाम म्हणून तरुणांमध्ये वैफल्यग्रस्तता वाढून आत्महत्येचे व जिवंत राहिल्यास व्यसनांचे प्रमाण वाढत आहे. या भयानक परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी आध्यात्मिक क्रांतीची गरज आहे. त्यासाठी आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली आपली वैदिक संस्कृती समजून घेणे व तिचे पालन करणे यातच तरुणांचे हितही आहे. आज जगाला गीता, भागवतवर आधारित असलेल्या वैभवशाली संस्कृतीची गरज आहे. यासाठी तरुणांनी पुढे येऊन पाश्चात्यांप्रमाणे भोगवादी संस्कृतीमध्ये आपले आयुष्य वाया न घालवता आपल्या पूर्वजांप्रमाणेच त्याग, समर्पणाची भावना स्वीकारून हा वारसा पुढे नेणे गरजेचे आहे.
वृंदावनदास








