नवी दिल्ली : ऑलिम्पिकमधील भारताचे आशास्थान असलेला आघाडीचा मुष्टियोद्धा ब्रिजेश यादव (81 किलो गट) याच्या चेहऱयाला सराव करताना गंभीर दुखापत झाल्याने तो तातडीने मायदेशी परतणार आहे. भारताचे मुष्टियुद्ध पथक सध्या इटलीमध्ये ट्रेनिंग घेत आहे, त्या ठिकाणी हा प्रकार घडला असल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे.
इटलीतील असिसी येथे भारताचे 27 सदस्यांचे पथक 52 दिवसांच्या ट्रेनिंग व स्पर्धेसाठी वास्तव्यास आहे. गेल्या वर्षीच्या इंडिया ओपन व थायलंड ओपन बॉक्सिंग स्पर्धेत यादवने रौप्यपदके मिळविली होती. 10 नोव्हेंबर रोजी सहकाऱयासमवेत ठोसेबाजीचा सराव करताना त्याच्या चेहऱयाला गंभीर दुखापत होऊन प्रॅक्चर झाले. यानंतर साहायक प्रशिक्षक स्टाफने त्याला ताबडतोब सराव थांबवण्यास सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यादवच्या डाव्या डोळय़ाखालील भागात मायक्रोप्रॅक्चर झाले असून त्यामुळे गाल व जबडय़ाच्या हालचालीवर परिणाम झाला आहे. त्याचे सीटी स्कॅन करण्यात आले असून सुदैवाने त्याच्या दृष्टीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे त्यात स्पष्ट झाले. दुखापतीनंतरही तो सरावासाठी रिंगणात उतरला होता. पण डोक्याची हालचाल करताना त्याला तीव्र वेदना होत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याला हा दौरा संपेपर्यंत पूर्ण विश्रांती देण्याचा निर्णय घेतला गेला. भारतात परतल्यानंतर त्याच्यावर मॅक्सिलोफेशियल शस्त्रक्रिया केली जाण्याची शक्यता आहे.
यादवला मायदेशी पाठवण्याचा निर्णय इटलीत पथकासोबत असलेल्या भारतीय वैद्यकीय स्टाफने चार दिवसांपूर्वी घेतल्याचे सूत्राने पुढे सांगितले. त्याच्या कोव्हिड 19 चाचणीचा अहवाल अद्याप आला नसल्याने त्याचे येणे थोडेसे लांबले असल्याचे सांगण्यात आले.
भारताचे ट्रेनिंग सेंटर आता मिलानमध्ये
दरम्यान, भारतीय मुष्टियुद्ध पथकाला असिसीतील नॅशनल बॉक्सिंग ट्रेनिंग सेंटर इटलीतीलच मिलान या शहरात हलविण्याचा निर्णय घेणे भाग पडले आहे. आधीच्या वेळापत्रकात मिलानचा समावेश नव्हता. असिसीमधील केंद्राच्या अधिकाऱयांनी, तेथे विभागीय स्पर्धा होणार असल्याने भारतीय पथकाला ते उपलब्ध होणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे गेल्या आठवडय़ाच्या अखेरीस भारतीय पथक कोव्हिड 19 चाचणीनंतर मिलानमध्ये दाखल झाले आहे. मिलानमध्ये आल्यानंतरही त्यांची पुन्हा एकदा चाचणी घेण्यात आली आहे.
16 व 21 ऑक्टोबर रोजी दोन टप्प्यात भारतीय पथक असिसीमध्ये दाखल झाले होते. 30 नोव्हेंबर रोजी हे पथक जर्मनीतील कोलॉन येथे होणाऱया केमिस्ट्री चषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जाणार आहे. ही स्पर्धा 15 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. पण जर्मनीत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होत असल्याने स्थानिक प्रशासनाने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी 20 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे भारतीय पथक तेथे जाण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. कोलॉनमध्ये भारतीय पथक दोन आठवडे सराव करणार होते. भारताच्या प्रशिक्षण स्टाफमधील काही जणांनी या स्पर्धेत सहभागी न होण्याचा सल्ला दिला आहे तर भारतीय खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याचा अनुभव मिळणार असल्याने त्यात सहभागी होण्याची इच्छा काहींनी व्यक्त केली आहे.









