वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी होणाऱया विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेसाठी भारताचा पुरूष मुष्टियुद्ध संघ बुधवारी बेलग्रेडला रवाना झाला. बेलग्रेडमध्ये विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेला 24 ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे.
या स्पर्धेसाठी भारतीय मुष्टियुद्ध संघटनेने तेरा जणांचा संघ निवडला. त्यामध्ये अनुभवी दीपककुमार, शिवा थापा आणि संजित यांचा समावेश आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरूष मुष्टियोद्धय़ांनी संपूर्ण निराशा केली. बेलग्रेडमध्ये होणाऱया विश्व मुष्टियुद्ध स्पर्धेत 105 देशांचे सुमारे 600 स्पर्धक सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील विविध वजनगटातील सुवर्णपदक विजेत्याला प्रत्येकी एक लाख डॉलर्स, रौप्यपदक विजेत्याला प्रत्येकी 50 हजार डॉलर्स तर दोन्ही कास्यपदक विजेत्यांना प्रत्येकी 25 हजार डॉलर्सचे बक्षीस दिले जाणार आहे. सदर स्पर्धा 13 विविध वजन गटामध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात गोविंद सहानी (48 किलो), दीपककुमार (51 किलो), आकाश (54 किलो), रोहित मोर (57 किलो), वरिंदर सिंग (60 किलो), शिवा थापा (63.5 किलो), आकाश (67 किलो), निशांत देव (71 किलो), सुमीत (75 किलो), सचिनकुमार (80 किलो), लक्ष्य (86 किलो), संजित (92 किलो) आणि नरेंद्र (92 किलोवरील) यांचा समावेश आहे








