वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
17 सदस्यीय भारतीय महिला व पुरुष मुष्टियोद्धय़ांचे पथक 73 व्या स्ट्रँडा मेमोरियल मुष्टियुद्ध स्पर्धेत भाग घेण्यासाठी शुक्रवारी बल्गेरियातील सोफियाकडे रवाना झाले. या पथकात सात पुरुष व दहा महिला बॉक्सर्सचा समावेश आहे.
युरोपमधील ही सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धा असून 18 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत ती होत आहे. भारतीय मुष्टियोद्धय़ांसाठी ही या वर्षातील पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. ट्रेनिंगच्या वेळी दुखापती झाल्याने सहा पुरुष बॉक्सर्सना या स्पर्धेत सामील करण्यात आले नाही. त्यामुळे कमी संख्येचे पुरुष पथक या स्पर्धेसाठी पाठविण्यात आले आहे. या संघात राष्ट्रीय पदकविजेत्या बॉक्सर्सचाच अधिक समावेश करण्यात आला आहे. महिलांचे पथकही दहापर्यंत कमी करण्यात आले आहे. पूजा रानी (81 किलो) व सोनिया लाथेर (57 किलो) या दुखापतीतून अद्याप पूर्ण बऱया झाल्या नसल्याने त्यांना माघार घ्यावी लागली.
स्पर्धेत सहभागी होण्याचा सर्व खर्च सरकार करणार असल्याचे भारतीय क्रीडा प्राधिकरणने सांगितले. या स्पर्धेच्या मागच्या आवृत्तीत भारताने दोन पदके जिंकली होती. दीपक कुमारने रौप्य व नवीन बोराने कांस्य मिळविले होते. महिलांना मात्र पदक मिळविण्यात अपयश आले होते.
स्पर्धेसाठी रवाना झालेले भारतीय पथक ः महिला ः नितू (48 किलो), अनामिका (50), निखत झरीन (52), शिक्षा (54), मीना रानी (60), परवीन (63), अंजली तुशिर (66), अरुंधती चौधरी (70), सवीती (75), नंदिनी (81 किलोवरील). पुरुष ः रोहित मोर (57 किलो), वरिंदर सिंग (60), आकाश (67), सुमित (75), सचिन कुमार (80), लक्षय चहर (86), नरेंदर (92 किलोवरील).









