रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अधिवेशन : भारतीय तंत्रज्ञाचे केले कौतुक
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
रिपब्लिकन पार्टीच्या नॅशनल कन्व्हेंशनमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका भारतीय सॉफ्टवेअर अभियंत्याला अमेरिकेचे नागरिकत्व प्रदान केले आहे. ट्रम्प यांनी एका कार्यक्रमात भारतीय महिलेला नागरिकत्व प्रमाणपत्र सोपविले आहे. कायदेशीर इमिग्रेशनला स्वतःचा पाठिंबा दर्शविण्यासाठी ट्रम्प यांनी कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे मानले जात आहे. अध्यक्ष झाल्यापासून ट्रम्प सातत्याने अवैध स्थलांतराच्या विरोधात भूमिका मांडत आले आहेत.
ट्रम्प यांनी कार्यक्रमात सुंदरी नारायण यांना अमेरिकेचे नागरिकत्व प्रदानक sले आहे. सुंदरी या एक प्रतिभावंत सॉफ्टवेअर डेव्हलपर असून त्या पतीसोबत अमेरिकेत मागील 13 वर्षांपासून राहत असल्याचे ट्रम्प म्हणाले. सुंदरी यांनी नियमांचे पालन केले, अमेरिकेचा इतिहास अभ्यासला, आमच्या मूल्यांना स्वीकारले आणि स्वतःला सर्वाधिक प्रामाणिक सिद्ध केल्याचे गौरवोद्गार अध्यक्षांनी काढले आहते. सुंदरी नारायणन यांच्यासोबत सूदान, बोलिविया, लेबनॉन आणि घानाच्या प्रत्येकी एका नागरिकाला अमेरिकेचे नागरिकत्व देण्यात आले आहे.
अवैध स्थलांतराला विरोध
अवैध स्थलांतराच्या विरोधात ट्रम्प यांनी कठोर पावले उचलली आहेत. 2016 च्या निवडणुकीत ट्रम्प यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. यंदाही अवैध स्थलांतराच्या मुद्दय़ाला त्यांनी स्वतःच्या प्रचारात महत्त्वाचे स्थान दिले आहे. अवैध स्थलांतर रोखण्यासाठी मेक्सिकोच्या सीमेवर भिंत उभारत ट्रम्प यांनी अवैध प्रवेश करणाऱया लोकांना त्यांच्या मायदेशी परत पाठविण्याचे पाऊल उचलले आहे. तसेच त्यांनी एच-1 बी व्हिसा गुणवत्तेच्या आधारावर देण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे.
मेलानियांची हजेरी
रिपब्लिकन पार्टीच्या अधिवेशनात ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया यांनीही भाग घेतला आहे. मेलानिया देखील अमेरिकेत स्थलांतरितच होत्या. त्या मूळच्या स्लोवेनिया येथील आहेत. नागरिकत्वाच्या चाचणीसाठी आपण शिक्षण घेतले होते. कठोर मेहनत आणि दृढ संकल्पामुळेच अमेरिकेची नागरिक होऊ शकल्याचे मेलानिया यांनी म्हटले आहे. यादरम्यान मेलानिया यांनी ट्रम्प यांना मत देण्याचे आवाहन केले आहे. ट्रम्प हे पारंपरिक राजकीय नेते नाहीत. ते केवळ बोलत नाहीत तर कृतीची मागणी करतात आणि त्यांना हवे असलेले परिणाम प्राप्त करतात असे त्या म्हणाल्या.









