वृत्तसंस्था/ ऑकलंड
न्यूझीलंड दौऱयावर असणाऱया भारताच्या महिला हॉकी संघाला तिसऱया सामन्यात यजमान संघाकडून 0-1 अशा गोलफरकाने निसटता पराभव स्वीकारावा लागला. त्यांचा हा दुसरा पराभव आहे.
होप राल्फने 37 व्या मिनिटाला न्यूझीलंडचा एकमेव विजयी गोल नोंदवला. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय महिलांनी यजमानावर 4-0 अशी एकतर्फी मात केली होती. त्यानंतर दुसऱया सामन्यात न्यूझीलंड डेव्हलपमेंट संघाने 2-1 असा विजय मिळविला होता. भारताने या सामन्यात प्रारंभापासूनच आक्रमणाला सुरुवात केली आणि दुसऱयाच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळविला. पण त्याचा त्यांना उपयोग करून घेता आला नाही. पुढच्याच मिनिटाला न्यूझीलंडने लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. पण भारताने भक्कम बचाव करीत ते फोल ठरविले. 37 व्या मिनिटाला राल्फने मैदानी गोल नोंदवून न्यूझीलंडला आघाडी मिळवून दिली आणि हाच गोल शेवटी निर्णायक ठरला. 4 फेब्रुवारी रोजी भारतीय महिलांची लढत ग्रेट बिटनशी होणार आहे.