नव्याने सुरुवात हाच एकमेव पर्याय, फलंदाजीत कामगिरी उंचावण्याचे लक्ष्य
हॅमिल्टन / वृत्तसंस्था
विंडीजविरुद्ध आज (शनिवार दि. 12) होणाऱया आयसीसी महिला वनडे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या साखळी सामन्यात भारतीय महिला संघाला विशेषतः आघाडी फळीवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. भारतीय महिला संघाची ही स्पर्धेतील तिसरी लढत असून यापूर्वी त्यांनी पाकिस्तानविरुद्ध विजय व न्यूझीलंडविरुद्ध पराभव, अशी संमिश्र कामगिरी नोंदवली. आजच्या लढतीला भारतीय प्रमाणवेळेनुसार, सकाळी 6.30 वाजता सुरुवात होईल.
भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 62 धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर पाचव्या स्थानी फेकला गेला असून येथे विजयाच्या ट्रकवर परतण्याचे त्यांच्यासमोर लक्ष्य असेल. स्मृती मानधना, मिताली राज, युवा यास्तिका भाटिया व अष्टपैलू दीप्ती शर्मा यांना न्यूझीलंडविरुद्ध खेळ उंचावता न आल्याने टीकेला सामेरे जावे लागले. त्या लढतीत हरमनप्रीत कौरने 62 चेंडूत 71 धावा जमवल्यानंतरही भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.
शफाली वर्माला खराब फॉर्ममुळे मागील लढतीत संघात स्थान देण्यात आले नव्हते. मात्र, यास्तिका भाटिया देखील अपयशी ठरली आणि आता पुन्हा शफालीला संघात समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे. भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडविरुद्ध मागील लढतीत 162 चेंडू अर्थात, तब्बल 27 षटके निर्धाव खेळून काढली. पहिल्या 20 षटकात तर त्यांना केवळ 50 धावा जमवता आल्या. याचा त्यांना फटका बसला होता. मागील लढतीच्या पार्श्वभूमीवर, मुख्य प्रशिक्षक रमेव पोवार यांनी आपली नाराजी जाहीर करताना वरिष्ठ खेळाडूंनी अधिक जबाबदारीने खेळणे अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे.
विंडीजचा संघ बहरात
विंडीज महिला संघाने या स्पर्धेत उत्तम सुरुवात केली असून इंग्लंडविरुद्ध मागील लढतीत त्यांनी 225 धावांचे यशस्वी संरक्षण केले होते. गोलंदाजीत उत्तम पर्याय हाताशी उपलब्ध आहेत, ही विंडीज महिला संघाची कर्णधार स्टेफानी टेलरसाठी आश्वासक बाब राहिली आहे. डॉटिनने लॉरेन विनफिल्ड-हिलचा हवेत झेपावत घेतलेला अप्रतिम एकहाती झेल वैशिष्टय़पूर्ण ठरला होता. कॉनेल, सेलमन, चिनेले हेन्री व अनिसा यांच्यामुळे विंडीजची गोलंदाजी देखील भक्कम आहे.
प्रतिस्पर्धी संघ
भारत ः मिताली राज (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार, रिचा घोष (यष्टीरक्षक), तानिया भाटिया (यष्टीरक्षक), स्नेह राणा, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, झुलन गोस्वामी, रेणुका सिंग.
विंडीज ः स्टेफानी टेलर (कर्णधार), अनिसा मोहम्मद (उपकर्णधार), ऍलिया ऍलेन, शेमेन कॅम्पबेल, शमिला कॉनेल, दियान्द्रा डॉटिन, ऍफी फ्लेचर, चेरी ऍन प्रेझर, चिनेले हेन्री, किसिया नाईट, हेलेय मॅथ्यूज, चेडन नेशन, करिष्मा रॅमहॅरक, शकेरा सेलमन, रॅशदा विल्यम्स.
सामन्याची वेळ ः सकाळी 6.30 वा.









