उत्तर ध्रूवावरून उड्डाण करणार महिला वैमानिकांचे पथक
वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को
एअर इंडियाच्या महिला वैमानिकांच्या पथकाने उत्तर ध्रूवावरून जगातील सर्वातील सर्वाधिक लांबीच्या हवाई मार्गावर उड्डाण केले आहे. अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को येथून 16,000 किलोमीटरचे अंतर कापून या महिला वैमानिक सोमवारी सकाळी बेंगळूर येथे पोहोचतील. एअर इंडियाचे विमान बेंगळूर येथे पोहोचण्यासाठी उत्तर ध्रूवावरून जात अटलांटिक मार्ग पत्करणार आहे.
उत्तर ध्रूवावरून उड्डाण करणे अत्यंत तांत्रिकदृष्टय़ा आव्हानात्मक असून याकरता दक्षतेसह अनुभवाची गरज भासत असल्याचे उड्डाणविषयक तज्ञांचे मानणे आहे. एअर इंडियाच्या वैमानिकांनी यापूर्वीही ध्रूवीय मार्गावर उड्डाण केले आहे. परंतु पहिल्यांदाच केवळ महिला वैमानिकांचे पथक उत्तर ध्रूवावरून उड्डाण करत आहे.
उत्तर ध्रूवावरून उड्डाण करणे अत्यंत आव्हानात्मक असल्यानेच एअरलाइन्स कंपन्या या मार्गावर स्वतःचे सर्वोत्तम आणि अनुभवी वैमानिक पाठवत असतात. यंदा एअर इंडियाने ही जबाबदारी महिला वैमानिकांना सोपविली असल्याचे अधिकाऱयाने म्हटले आहे.
सॅन फ्रान्सिस्को ते बेंगळूर उड्डाण
उद्घाटन विमान (इनऑगरल फ्लाइट) एएल 176 ने सॅन फ्रान्सिस्को येथून शनिवारी स्थानिक प्रमाणवेळेनुसार रात्री 8.30 वाजता उड्डाण केले आहे. हे विमान सोमवारी पहाटे 3.45 वाजता (स्थानिक प्रमाणवेळेनुसार) बेंगळूर येथील विमानतळावर उतरणार आहे.
नागरी उड्डाण मंत्र्यांकडून कौतुक
कॅप्टन जोया अगरवाल, कॅप्टन पी. थानमाई, कॅप्टन आकांक्षा सोनावरे आणि कॅप्टन शिवानी मन्हास यांचे महिलांवर आधारित कॉकपिट चालक दल बेंगळूर आणि सॅन फ्रान्सिस्को मधील ऐतिहासिक उद्घाटन उड्डाणाचे संचालन करणार आहे. सॅन फ्रान्सिस्को आणि बेंगळूरमधील हवाई अंतर जगात सर्वाधिक आहे. एअर इंडियाची महिला शक्ती जगभरात झळकत असल्याचे उद्गार नागरी उड्डहण मंत्री हरदीप पुरी यांनी ट्विट करत काढले आहेत.
जोया यांची आणखी एक कामगिरी
जोया अगरवाल यांनी 2013 मध्ये बोइंग 777 या विमानाचे उड्डाण करून सर्वात कमी वयाची महिला वैमानिक होण्याचा गौरव प्राप्त केला होता. जोया आता उत्तर ध्रूवावरून उड्डाण करणाऱया एअर इंडियाच्या पहिल्या महिला कमांडर ठरणार आहेत.
फ्लाइंग कमांडर जोया अगरवाल
एअर इंडियाच्या कॅप्टन जोया अगरवाल फ्लाइटला कमांड करतील. जगभरात बहुतांश लोक स्वतःच्या जीवनात उत्तर ध्रूव किंवा त्याचा नकाशाही पाहू शकत नाहीत. नागरी उड्डाण मंत्रालय तसेच आमच्या फ्लॅग कॅरियरने विश्वास दाखविल्याबद्दल मी स्वतःला सुदैवी मानते. उत्तर ध्रूवावरून सॅन फ्रान्सिस्को ते बेंगळूरपर्यंत जगातील सर्वात लांबीच्या उड्डाणाला कमांड करण्याची ही खरोखरच सुवर्णसंधी असल्याचे जोया यांनी म्हटले आहे.