वृत्तसंस्था /नवी दिल्ली :
भारतीय महिला फुटबॉल लीग 2019-20 स्पर्धेची सुरुवात 24 जानेवारी रोजी बेंगळूरमध्ये होणार असल्याचे गुरुवारी अखिल भारतीय फुटबॉल फेरडेशनने (एआयएफएफ) सांगितले.
या स्पर्धेची ही चौथी आवृत्ती असून देशभरातील 12 क्लब संघ त्यात सहभागी झाले आहेत. अंतिम स्पर्धेसाठी पात्र ठरण्याकरिता विभागीय पात्रता स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यातील पात्रता मिळविलेले संघ बेंगळूरमध्ये दाखल झाले आहेत. या स्पर्धेसाठी मणिपूर, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल, पंजाब, कर्नाटक व शेष भारत संघ यांनी पात्रता मिळविली आहे. 12 संघांचे दोन गट करण्यात आले असून गटात प्रत्येक संघ एकमेकाविरुद्ध एकेक सामना खेळणार आहेत आणि गटात अव्वल दोन क्रमांकावरील संघ उपांत्य फेरीत खेळतील. मणिपूरचा क्रीफ्शा एफसी व कर्नाटकाचा किकस्टार्ट एफसी यांच्यातील लढतीने स्पर्धेची सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे.