वृत्तसंस्था/ लिमा
येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ कनिष्ठांच्या विश्व नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या सांघिक स्कीट नेमबाजी प्रकारात भारतीय महिला नेमबाजांनी सुवर्णपदक पटकाविले. भारताच्या पुरूष संघाला या क्रीडाप्रकारात कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
महिलांच्या सांघिक स्कीट नेमबाजी प्रकारात भारताच्या अरीबा खान, रैझा धिलाँ आणि गनेमत सेखाँ यांनी सुवर्णपदक पटकाविताना इटलीच्या स्पर्धकांचा पराभव केला. पुरूषांच्या सांघिक स्कीट नेमबाजीत भारताच्या रजवीर गिल, आयुष रूद्रराजू
आणि अभय सिंग सेखाँ यांनी तुर्कीवर 6-0 अशी मात करत कास्यपदक मिळविले. या स्पर्धेत गेल्या गुरूवारी भारताची महिला नेमबाज गनेमत सेखाँने महिलांच्या वैयक्तिक स्कीट नेमबाजीत रौप्यपदक मिळविले होते. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कास्य अशी एकूण सात पदकांची कमाई करत पदक तक्त्यामध्ये दुसरे स्थान मिळविले आहे. अमेरिकेने तीन सुवर्णासह सात पदके घेत पहिले स्थान घेतले आहे. या स्पर्धेत 32 देशांचे सुमारे 370 नेमबाज सहभागी झाले आहेत.









