वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या कीर्ती गुप्ता, मनीषा कीर, राजेश्वरी कुमारी या महिला तिरंदाज ट्रप संघाने कैरोमधील आयएसएसएफ विश्व चषक तिरंदाजी स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. अंतिम फेरीत त्यांना रशिया संघाकडून पराभव स्वीकारावा लागला.
अतिशय चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत भारतीय संघाने 0-4 अशा पिछाडीवरून मुसंडी मारत 4-4 अशी बरोबरी साधली होती. मात्र 15 शॉट्सच्या शेवटच्या मालिकेत त्यांना हा जोम राखता आला नाही आणि त्यांना अखेर दुसऱया स्थानावर समाधान मानावे लागले. भारताला या स्पर्धेत दोन पदके मिळाली. पुरुषांच्या स्कीट संघाने याआधी कांस्यपदक मिळविले होते. कीर्ती, मनीषा व राजेश्वरी या तिघींनी मिळून पात्रता फेरीत एकूण 444 गुण मिळवित सुवर्णपदकाच्या फेरीत प्रवेश मिळविला होता. रशियन संघाने पात्रता फेरीत सर्वाधिक 463 गुण मिळविले होते. 25 फटक्यांच्या एकूण सात फेऱया घेण्यात आल्या. त्यापैकी पाच फेऱया आदल्या दिवशी घेतल्या गेल्या होत्या.
शेवटच्या दोन फेऱयांत भारताच्या तिघीनीही 20 व वीसहून जास्त गुण मिळविले. त्यात मनीषाने सर्वाधिक 175 पैकी 158 गुण मिळविले. पुरुष संघाला मात्र पदकाच्या फेरीत स्थान मिळविता आले नाही. भारताच्या पुरुष संघाने 469 गुण घेत या प्रकारात सहावे स्थान मिळविले. एकूण 11 संघांनी यात भाग घेतला होता. रशिया व क्रोएशिया यांनी अंतिम फेरी गाठली तर यजमान इजिप्त व स्लोव्हाकिया यांच्यात कांस्यपदकासाठी लढत होणार आहे.









