वृत्तसंस्था/ डंबुला (लंका)
भारतीय महिला क्रिकेट संघाने शनिवारी येथे यजमान लंकाविरूद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली आहे. या मालिकेतील दुसऱया सामन्यात भारताने लंकेचा 5 गडय़ांनी पराभव केला. भारतीय संघातील हरमनप्रीत कौरला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.
या दुसऱया सामन्यात लंकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 123 धावा जमविल्या. त्यानंतर भारताने 19.1 षटकात 5 बाद 127 धावा जमवित विजय नोंदविला.
लंकेच्या डावात सलामीच्या विश्मी गुणरत्ने आणि चमारी अट्टापटू यांनी दमदार फलंदाजी करताना 13.5 षटकांत 87 धावांची भागीदारी केली. गुणरत्नेने 50 चेंडूत 6 चौकारांसह 45 तर अट्टापटूने 41 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 43 धावा जमविल्या. ही जोडी फुटल्यानंतर लंकेचे उर्वरित फलंदाज लवकर बाद झाले. लंकेचे शेवटचे सहा फलंदाज 38 धावांत तंबूत परतले.
भारतातर्फे दिप्ती शर्माने 34 धावांत 2 तर रेणुका सिंग, राधा यादव, पुजा वस्त्रकर आणि हरमनप्रीत कौर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. लंकेच्या डावात 1 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताच्या डावात सलामीच्या स्मृती मानधनाने 34 चेंडूत 8 चौकारांसह 39, शफाली वर्माने 10 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 17, मेघनाने 10 चेंडूत 4 चौकारांसह 17, रॉड्रिग्यूजने 3, भाटियाने 18 चेंडूत 13, कर्णधार हरमनप्रीत कौरने 32 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 31 तर दीप्ती शर्माने नाबाद 5 धावा जमविल्या. भारताच्या डावात 1 षटकार आणि 8 चौकार नोंदविले गेले. लंकेतर्फे इनोका रणवीराने 18 धावांत 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
लंका 20 षटकांत 7 बाद 123 (व्ही गुणरत्ने 45, सी अट्टापटू 43, दीप्ती शर्मा 2-34) भारत 19.1 षटकांत 5 बाद 127 (स्मृती मानधना 39, शफाली वर्मा 17, मेघना 17, हरमनप्रीत कौर नाबाद 31, रॉड्रिग्यूज 3, भाटिया 13, दीप्ती शर्मा नाबाद 5, इनोका रणवीरा 2-18, सुगंधा कुमारी 1-20, रणसिंघे 2-32).