डॉ. टेशी थॉमस यांचे प्रतिपादन : गोकाक येथे कायकश्री पुरस्काराने सन्मानित
वार्ताहर/ घटप्रभा
भारतीय महिला धाडसी, संयमी व शिस्तप्रिय आहेत. असाध्य कार्य साध्य करुन दाखवण्याचे कर्तृत्व त्यांच्यामध्ये असल्याचे प्रतिपादन भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील वैज्ञानिक डॉ. टेशी थॉमस यांनी केले.
गोकाक येथील शुन्य संपादन मठाधीश कै. बसव महास्वामी यांच्या 15 व्या पुण्यस्मृतिनिमित्त आयोजित शरण्य संस्कृती उत्सवामध्ये त्यांना यावर्षीच्या कायकश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शिमोगा आनंदपूर मठाधीश मल्लिकार्जुन मरघराजेंद्र स्वामीजी यांचे दिव्य सानिध्य होते.
डॉ. टेशी थॉमस म्हणाल्या, आईमुळेच जगाचा प्रारंभ झाला. विज्ञानाच्या प्रगतीमुळे मनुष्याच्या हातामध्ये सर्व माहिती आली असून त्याचा सदुपयोग करुन घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. डॉ. थॉमस यांनी इस्रोच्या माध्यमातून देशाची सुरक्षा भक्कम करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. यावेळी मुरघराजेंद्र महास्वामीजी, प्रमुख पाहुण्या असलेल्या शेतकरी राजेश्वरी पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वामीजींच्या हस्ते डॉ. थॉमस यांना 1 लाखाचा धनादेश व कायकश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. स्वागत इरण्णा कडाडी यांनी केले. तर आभार शैला कोकरी यांनी मानले.









