वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी होणाऱया बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन या क्रीडाप्रकाराचा ड्रॉ काढण्यात आला. विद्यमान विजेत्या भारताला हा ड्रॉ सोपा असून त्यांना या स्पर्धेत बाद फेरी गाठण्यास विशेष कष्ट घ्यावे लागणार नाहीत. भारताचा ड्रॉ नुसार मिश्र सांघिक बॅडमिंटन प्रकारात गट-1 मध्ये समावेश झाला आहे. या गटामध्ये ऑस्ट्रेलिया, लंका आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे.
बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 29 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. प्रत्येकी चार वर्षांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भरविली जाते. बॅडमिंटन क्रीडा प्रकारात सुरुवातीला वैयक्तिक गटातील सामने होणार असून त्यानंतर मिश्र सांघिक विभागातील लढती होतील. मिश्र सांघिक विभागातील अंतिम सामना 2 ऑगस्टला होणार आहे. या क्रीडाप्रकारात एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत.
या 16 संघांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. गोल्डकोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने अंतिम लढतीत पाचवेळा जेतेपद मिळविणाऱया मलेशियाचा पराभव करत सुवर्णपदक मिळविले होते. मलेशियाचा गट-4 मध्ये समावेश असून या गटात दक्षिण आफ्रिका, जमैका आणि झांबिया, त्याचप्रमाणे गट-2 मध्ये सिंगापूर, मॉरिशस, बार्बाडोस आणि इंग्लंड, गट-3 मध्ये कॅनडा, स्कॉटलंड, मालदिव आणि युगांडा यांचा समावेश आहे.









