नवी दिल्ली
एचएस प्रणॉय व जागतिक क्रमवारीतील दहावे मानांकित चिराग शेट्टी व सात्विकसाईराज रणकिररेड्डी यांनी पुढील आठवडय़ात होणाऱया ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धेमधून कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे माघार घेतली. ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप या हंगामातील पहिली वर्ल्ड टूर सुपर 1000 स्पर्धा असून टोकियो ऑलिम्पिकसाठी या माध्यमातून पात्रता प्राप्त केली जाऊ शकते. ही स्पर्धा दि. 11 मार्चपासून खेळवली जाणार आहे. बऱयाच भारतीय खेळाडूंनी आपण या स्पर्धेत खेळणार नसल्याची भारतीय बॅडमिंटन संघटनेला लेखी माहिती दिली असून यात एचएस प्रणॉय, चिराग-सात्विकसाईराज यांच्यासह मनू अत्री, बी. सुमीत रेड्डी, समीर वर्मा, सौरभ वर्मा यांचाही समावेश आहे, असे बॅडमिंटन संघटनेचे सचिव अजय सिंघानिया यांनी वृत्तसंस्थेला कळवले. या सर्व खेळाडूंची दुबईमार्गे प्रवास करण्याची मानसिकता नव्हती, असे संकेत आहेत. सायना नेहवाल, पीव्ही सिंधू, किदाम्बी श्रीकांत, अश्विनी पोनप्पा, एन. सिक्की रेड्डी व प्रणव जेरी चोप्रा हे मात्र या स्पर्धेत सहभागी होत आहेत.









