चोरलेली एके-47 घेऊन हल्लेखोर बँकेत : कर्जाच्या वादातून 13 राऊंड गोळीबार
वृत्तसंस्था/ कंपाला
युगांडाची राजधानी कंपालामध्ये एका 39 वषीय भारतीय बँकरची एका ऑफ ड्युटी पोलिसाने गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना 12 मे रोजी घडली असून 46,000 ऊपयांच्या कर्जावरून दोघांमध्ये वाद झाला होता. उत्तम भंडारी असे मृताचे नाव आहे. हल्लेखोराने हत्येसाठी चोरीच्या एके-47 असॉल्ट रायफलचा वापर केला. हल्लेखोराने बँकरवर 13 राऊंड गोळीबार केल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सीसीटीव्ही पॅमेऱ्यात संपूर्ण घटना कैद झाली आहे.
भंडारी यांच्याकडून कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेची परतफेड करण्यावरून हल्लेखोर इव्हान वाबवायर याचा 12 मे रोजी वाद झाला. भंडारी यांनी आपल्याला दिलेल्या कर्जापेक्षा अधिक रक्कम परत करण्यास सांगितल्यामुळे ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे कंपालाचे पोलीस अधिकारी पॅट्रिक ओनयांगो यांनी सांगितले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघांमध्ये वाद होताना दिसत आहे. यानंतर वाबवायर बंदूक हवेत उडवतो. यादरम्यान खोलीत उपस्थित लोक ओरडत पळाल्याचेही दिसत आहे. हल्लेखोर वाबवायर हा मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचेही पोलीस सूत्रांनी सांगितले. यापूर्वी दोनवेळा शस्त्र बाळगल्याबद्दल त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती. वाबवायरने आता आपल्या रूममेटची बंदूक चोरून ही हत्या केल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.









