वृत्तसंस्था/ नवी मुंबई
येथे सुरू असलेल्या महिलांच्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत यजमान भारतीय महिला फुटबॉल संघाला रविवारी होणाऱया चीन तैपेईविरुद्ध सामन्यात विजयाची नितांत गरज आहे. स्पर्धेतील आव्हान जिवंत राखण्यासाठी भारतीय संघाला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणे जरूरीचे आहे.
या स्पर्धेतील झालेल्या सलामीच्या सामन्यात तळाच्या स्थानावरील इराणने यजमान भारताला गोलशून्य बरोबरीत रोखले होते तर चीन तैपेईला या स्पर्धेत आतापर्यंत आठवेळा विजेतेपद मिळविणाऱया चीनने 4-0 असे पराभूत केले आहे. आगामी फिफाच्या विश्वकरंडक महिलांच्या फुटबॉल स्पर्धेतील प्ले ऑफ गटात स्थान मिळविण्यासाठी भारतीय महिला फुटबॉल संघाला रविवारच्या सामन्यात विजय मिळविणे जरूरीचे आहे. रविवारचा सामना जिंकल्यास भारतीय महिला फुटबॉल संघ उपांत्यपूर्व फेरी गाठू शकेल.
भारतीय महिला फुटबॉल संघाचा अ गटातील शेवटचा सामना बलाढय़ चीनविरुद्ध होणार आहे. 1979 नंतर भारताला या आंतरखंडीय फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. 12 संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत यजमान भारताला रविवारचा सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी झगडावे लागेल. फिफाच्या मानांकनात भारत 55 व्या तर चीन तैपेई 39 व्या स्थानावर आहे. रविवारी या स्पर्धेत बलाढय़ चीन-इराण यांच्यात दुसरा सामना खेळविला जाईल.









