वृत्तसंस्था / कोलकाता
2020-21 फुटबॉलच्या सुधारित हंगामाची घोषणा अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनतर्फे मंगळवारी करण्यात आली. सदर हंगाम 1 ऑगस्ट ते 31 मे 2021 या कालावधीत राहिल, असे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे फुटबॉलपटूंच्या बदलीसाठी 1 ऑगस्ट ते 20 ऑक्टोबर दरम्यान ट्रान्स्फर विंडो खुली करण्यात येईल, असे फेडरेशनच्या प्रवक्त्याने सांगितले.
भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या 2020-21 च्या फुटबॉल हंगामातील स्पर्धा वेळापत्रक आणि नोंदणी कालावधीला फिफाकडून अधिकृत मान्यता मिळाली आहे. फुटबॉल फेडरेशनतर्फे विविध राज्यांच्या फुटबॉल संघटनांना याची माहिती लेखी स्वरुपात देण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे भारतीय फुटबॉलपटूंच्या बदली (ट्रान्स्फर) प्रक्रियेचा विंडो 9 जूनपासून असतो आणि 31 ऑगस्टपर्यंत त्याची मर्यादा ठेवण्यात आली होती. पण यावर्षी कोरोना महामारी संकटामुळे फुटबॉल हंगामाचे सर्वच वेळापत्रक बदलले असल्याने आता 1 ऑगस्ट ते 20 ऑक्टोबर दरम्यान बदली फुटबॉलपटूंसाठी ट्रान्स्फर विंडो असेल. भारतीय फुटबॉल हंगामाचा शेवट आय लीग फुटबॉल स्पर्धेने केला जातो. पण चालू वर्षात कोरोना संकटामुळे आय लीग फुटबॉल स्पर्धा अर्धवट स्थितीत स्थगित करावी लागली आणि उर्वरित सामने खेळविता आले नाहीत. गुणतक्त्यातील कामगिरीनुसार मोहन बागान संघाला आय लीग स्पर्धेतील विजेता म्हणून घोषित करण्यात आले. आय लीग स्पर्धेतील शेवटच्या चार फेरीतील सामने कोरोना प्रसारामुळे खेळविता आले नाहीत, असे फेडरेशनच्या प्रवक्त्याने सांगितले.
आय लीग स्पर्धेतील यावर्षीच्या हंगामात शेवटचा सामना एटीके आणि चेन्नयीन एफसी यांच्यात खेळविला गेला आणि एटीकेने हा सामना जिंकला होता. सदर सामना गोव्यातील फातोर्डा स्टेडियमवर बंदिस्त स्वरुपात प्रेक्षकविना खेळविला गेला. फुटबॉलपटूंच्या बदलीसाठी दुसऱया टप्प्यातील प्रक्रियेकरिता ट्रान्स्फर विंडो 1 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान खुली करण्यात येणार आहे. 2022 च्या फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा पात्रतेचा सामना 8 ऑक्टोबरला भारत आणि आशियाई विजेता कतार यांच्यात होणार आहे. हा सामना भारतात खेळविला जाणार आहे. त्यानंतर भारताचा दुसरा सामना बांगलादेशबरोबर 12 नोव्हेंबरला देशाबाहेर तर 17 नोव्हेंबरला भारताचा तिसरा सामना अफगाणबरोबर अफगाणिस्तानमध्ये खेळविला जाईल.









