वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी भारताचा पुरूष हॉकी संघ रविवारी बेंगळूर येथून युरोप दौऱयासाठी प्रयाण करणार आहे. कोरोना महामारी समस्येमुळे जवळपास गेल्या मार्चपासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व हॉकी स्पर्धा थांबविण्यात आल्या होत्या. आता पुन्हा नव्याने हॉकीच्या घडामोडीना प्रारंभ होत आहे.
युरोप दौऱयासाठी हॉकी इंडियाने 22 खेळाडू आणि 6 प्रशिक्षक वर्गाची निवड केली आहे. भारतीय हॉकी संघ रविवारी युरोप दौऱयासाठी प्रथम जर्मनीला प्रयाण करणार आहे. जर्मनीत भारत आ णि जर्मन यांच्यात 28 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान सामने खेळविले जाणार आहेत. जर्मनीतील मुक्कामानंतर भारतीय हॉकी संघ बेल्जियमला रवाना होणार आहे. बेल्जियममध्ये 6 आणि 8 मार्च रोजी भारताचे सामने ब्रिटन बरोबर होणार आहेत.
युरोप दौऱयासाठी भारतीय संघाचे नेतृत्व गोलरक्षक पी.आर श्रीजेशकडे सोपविण्यात आले असून हरमनप्रित सिंग उपकर्णधार आहेत. भारतीय पुरूष हॉकी संघाचा हा युरोप दौरा 17 दिवसांचा राहील. भारतीय पुरूष हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्ध चांगली कामगिरी केल्याने त्यांना आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या विश्व मानांकनात चौथे स्थान मिळाले आहे.
गेल्या महिन्यात भारताच्या महिला हॉकी संघाने अर्जेंटिनाचा दौरा केला होता. तसेच भारताच्या कनिष्ठ महिला हॉकी संघाने चेलीच्या दौऱयात समाधानकारक कामगिरी केली आहे. युरोपच्या दौऱयावर जाणाऱया भारतीय पुरूष हॉकी संघातील सर्व खेळाडूंची आणि प्रशिक्षक वर्गाची प्रर्याणापूर्वी 48 तास अगोदर कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. भारताच्या 22 जणांच्या संघामध्ये नियमित कर्णधार मनप्रित सिंग, रूपिंदरपाल सिंग, वरूणकुमार आणि एस.व्ही सुनील यांचा समावेश नाही. रूपिंदरपाल सिंग आणि वरूणकुमार जखमी असल्याने त्यांना वगळण्यात आले तर काही वैयक्तिक अडचणीमुळे मनप्रित सिंग या दौऱयासाठी उपलब्ध होवू शकला नाही.
भारतीय पुरूष हॉकी संघ- पी.आर श्रीजेस (कर्णधार), कृष्णन पाठक, अमीत रोहीदास, डी. तिर्की, गुरिंदर सिंग, हरमनप्रित सिंग (उपकर्णधार), सुरेंद्रकुमार, जरमनप्रित सिंग, वीरेंद्र लाक्रा, चिंग्लेसेना सिंग, नीलकांत शर्मा, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, राजकुमार पाल, सिमरनजीत सिंग, समशेर सिंग, आकाशदीप सिंग, गुरूजंत सिंग, रमणदीप सिंग, दिलप्रित सिंग, मनदीप सिंग, ललितकुमार उपाध्याय.









