वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे जवळपास 10 महिन्यांच्या कालावधीनंतर भारतीय पुरूष हॉकी संघाने नव्या वर्षांच्या हॉकी हंगामाला प्रारंभ करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर जाण्याचे निश्चित केले होते. पण दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने हा दौरा रद्द करण्यात आल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे. पुनरागमनासाठी त्यांना आता आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
येत्या उन्हाळी मोसमात दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये 10 ते 27 जानेवारी दरम्यान समर हॉकी मालिका आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये यजमान दक्षिण आफ्रिका, भारत, बेल्जियम, ब्रिटन, फ्रान्स यांचा समावेश होता. दक्षिण आफ्रिकेने ही स्पर्धा रद्द केल्याचे जाहीर केले आहे. भारतीय पुरूष हॉकी संघाने यापूर्वी म्हणजे भुवनेश्वरमध्ये गेल्या वर्षी 21 आणि 22 फेब्रुवारीला प्रो लीग स्पर्धेतील सामने खेळले होते. दक्षिण आफ्रिकेचा दौरा रद्द झाल्याने आता भारतीय पुरूष संघ 11 ते 19 मार्च दरम्यान ढाका येथे होणाऱया आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भाग घेईल.









