नवी दिल्ली
भारतीय नेमबाजासाठी ऑस्ट्रेलियाचा ऑलिंपिक विजेता नेमबाज रसेल मार्क तसेच त्याची पत्नी लॉरेन मार्क आणि पेरूचे जुआन गिहा यांची शॉटगन नेमबाज प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने या नियुक्तीला अधिकृत मान्यता दिली आहे.
2004 साली झालेल्या ऍथेन्स ऑलिंपिक स्पर्धेत डबल ट्रप नेमबाजी स्पर्धेत रौप्यपदक मिळविणारे भारताचे माजी केंद्रीय मंत्री तसेच नेमबाज राजवर्धन सिंग राठोड यांना ऑस्ट्रेलियाच्या रसेल मार्क यांचे मार्गदर्शन मिळाले होते. त्याचप्रमाणे मार्क रसेल यांची पत्नी तसेच ऑलिंपिक नेमबाज लॉरेन मार्क यांची इंडियन शॉटगन हाय परफॉर्मन्स व्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 1992 च्या बार्सिलोना ऑलिंपिक स्पर्धेत पुरूषांच्या स्किट नेमबाजीत रौप्यपदक मिळविणारे पेरूचे जुआन गिहा यांची नवे स्किट प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वरील तीन प्रशिक्षक आपला कार्यभार एप्रिल महिन्यात हाती घेणार आहेत. 19 ते 29 एप्रिल दरम्यान इटलीत होणाऱया विश्वचषक शॉटगन स्पर्धेत भारतीय स्पर्धक सहभागी होणार असून त्यांना या नव्या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. प्रशिक्षक रसेल पती-पत्नी यांना मासिक किमान 8000 ते 10000 डॉलर्सचे वेतन मिळणार असल्याचे समजते.









