भाजप वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी दिली माहिती
प्रतिनिधी /पणजी
प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजना आता गोवा राज्यात सुरु करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी दिली.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, युपीए सरकारने 2008 मध्ये सदर परियोजना सुरु केली परंतु तिचा प्रसार फारसा झाला नाही म्हणून मोदी सरकारने पुन्हा एकदा त्या योजनेचा 2015 मध्ये शुभारंभ केला. तिचा फायदा गोव्यात लोकांना व्हावा म्हणून आता प्रयत्न करण्यात येणार असून देशभरात या योजनेचे सुमारे 8664 स्टोअर्स आहेत. तेथे किफायती दरात विविध प्रकारची औषधे उपलब्ध करण्यात येत असून त्याचा फायदा गरीब जनतेसाठी होतो, असा दावा डॉ. साळकर यांनी केला आहे.
या स्टोअर्समधून मोठय़ा प्रमाणात अनुदानित दराने औषधांची विक्री होत असून गोव्यातील लोकांना त्याचा फायदा मिळावा म्हणून प्रयत्न करण्यात येणार आहेत. या परियोजनेसाठी गोव्यात विविध ठिकाणी केंद्र सुरु करण्याचा इरादा असून फार्मासिस्ट असलेल्या शिकलेल्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. डॉ. देवदत्त सैल त्यावेळी उपस्थित होते.









