वृत्तसंस्था/ सिडनी
ऑस्ट्रेलिया दौऱयावर मर्यादित षटकांच्या मालिका सर्वप्रथम होणार आहेत. मात्र कर्णधार विराट कोहलीसह सर्व भारतीय खेळाडूंनी पुढील महिन्यात होणाऱया कसोटी मालिकेवर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आले. मंगळवारी त्यांनी नकली सामना खेळत सराव केला. त्यात वेगवान गोलंदाज लाल व गुलाबी चेंडूने गोलंदाजी करीत होते.
तिन्ही संघांत असणारे सर्व फलंदाज व गोलंदाज या सराव सत्रात सहभागी झाले होते. जलद गोलंदाज शमी व मोहम्मद सिराज हे कोहलीला गोलंदाजी करीत असताना व्हिडिओत दिसत आहेत. कोहलीनेच त्याचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. कोहली कसोटी मालिकेतील ऍडलेडमधील पहिला सामना खेळणार असून त्यानंतर तो मायदेशी परतणार आहे. या व्हिडिओत मैदानावरील मध्यावर असणारी खेळपट्टी वापरण्यात आली असून कसोटीप्रमाणे क्षेत्ररचना केल्याचे आणि नॉनस्ट्रायकर एंडलाही फलंदाज उभा असल्याचे दिसत आहे. सहसा नेटमधील सरावावेळी नॉनस्ट्रायकर फलंदाज असत नाही. सर्व खेळाडू आयपीएलमध्ये खेळून आले असल्याने पांढऱया चेंडूने सराव करण्याऐवजी कसोटीचा सराव करण्यावर भर दिला होता. सलामीवीर केएल राहुल गुलाबी चेंडूवर सराव करीत होता, त्यावरून डे-नाईट पहिल्या कसोटीत त्याला संधी दिली जाणार आहे, याचेच हे संकेत आहेत.
बीसीसीआयने पोस्ट केलेल्या व्हिडिओत शमी व मोहम्मद सिराज आलटून पालटून गोलंदाजी करीत असल्याचे दिसते. शमीचा तिन्ही संघांत समावेश असून या मालिकेत त्याच्यावर भारतीय गोलंदाजीचा मुख्य भार असणार आहे. सिराजला फक्त कसोटी संघात घेण्यात आले असून शमीचा कित्ता गिरवित त्याने काही चेंडू टाकले. त्यावेळी वरिष्ठ खेळाडू त्याचे निरीक्षण करीत होते. 26 वर्षीय सिराजने केवळ एक वनडे व 3 टी-20 सामने खेळले आहेत आणि नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये त्याने आरसीबीकडून खेळताना 9 सामन्यांत 11 बळी मिळविले आहेत. सोमवारी भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियातील वेगवान खेळपट्टय़ांचा विचार करून टेनिसबॉलवर सराव करताना दिसून आले. आयपीएलमध्ये संथ खेळपट्टय़ांवर खेळण्याची सवय झाली असल्याने त्यांना असा सराव करणे गरजेचे होते. वनडे मालिकेतील पहिले दोन सामने सिडनीत 27 व 29 नोव्हेंबरला तर 2 डिसेंबरला कॅनबेरामध्ये तिसरा सामना होणार आहे. त्यानंतर कॅनबेरातच 4 डिसेंबर रोजी पहिला टी-20 सामना होईल आणि शेवटचे दोन सामने सिडनीत 6 व 8 डिसेंबर रोजी खेळविले जाणार आहेत.









