वृत्त संस्था / नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (बीसीसीआय) अरब अमिरातमध्ये खेळविल्या जाणाऱया आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघातील खेळाडूंच्या नव्या जर्सीचे अनावरण बुधवारी मोठय़ा थाटात करण्यात आले. अनावरण समारंभावेळी भारतीय संघाला असंख्य शौकिनानी या आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
संयुक्त अरब अमिरातमध्ये आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकविरुद्धचा सामना दुबईमध्ये खेळविला जाणार आहे. स्पर्धेत भारत-पाक लढत प्रमुख आकर्षण राहील.
भारताच्या पुरूष आणि महिलांच्या क्रिकेट संघांसाठी एमपीएल स्पोर्टस्तर्फे किट पुरविले जाते. भारताच्या पुरूष आणि महिलांच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या संघांसाठी क्रिकेट किट उपलब्ध करून देणारे एमपीएल स्पोर्टस् हे अधिकृत पुरस्कर्ते आहेत.
नव्या जर्सीच्या अनावरण समारंभावेळी मंडळाचे सचिव जय शहा तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. क्रिकेटपटूंसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या नव्या जर्सीची विक्री विविध शहरातील रिटेल आऊटलेट्समध्ये केली जाणार असून या जर्सीची किंमत 1799 रूपये अशी राहील. कर्णधार कोहलीच्या स्वाक्षरी असलेल्या 18 नंबर जर्सीचे देखील यावेळी अनावरण करण्यात आले.









