दोन डोस घेतलेल्यांना थेट प्रवेश मिळणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलिया सरकारच्या आरोग्य विभागाने भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सिन लसीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे ही लस घेतलेल्या भारतीय नागरिकांना ऑस्ट्रेलियात थेट प्रवेश मिळणार आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार कोव्हॅक्सिन लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले आहे, असे मानले जाणार आहे. म्हणजेच, आता लस घेतलेल्या कोणत्याही भारतीयाला लसीकरण प्रमाणपत्रासह ऑस्ट्रेलियाला जाता येणार आहे. त्याला 14 दिवस क्वारंटाईन रहावे लागणार नाही.
ऑस्ट्रेलियाच्या थॅरेप्युटिक गुड्स ऍडमिनिस्ट्रेशनने कोव्हॅक्सिनला मान्यता देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती भारतातील ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त बॅरी ओ’फेरेल एओ यांनी दिली. ऑस्ट्रेलियन सरकारने प्रवाशांच्या लसीकरणाबाबतची योग्य स्थिती जाणून घेण्यासाठी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला मंजुरी दिली आहे, असे त्यांनी सोमवारी स्पष्ट केले. जागतिक आरोग्य संघटनेकडून कोव्हॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यासाठी टाळाटाळ होत असताना दुसरीकडे ऑस्ट्रेलिया सरकारने मंजुरी दिल्याने भारतीयांना दिलासा मिळाला आहे.
‘डब्ल्यूएचओ’चा निर्णय बुधवारी अपेक्षित
भारतात निर्मिती झालेल्या कोव्हॅक्सिन लसीचा आपत्कालीन वापरासाठीच्या यादीत समावेश करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने आणखी काही माहिती मागितली होती. येत्या काही दिवसात लस मंजुरीसाठीची बैठक पार पडण्याची शक्मयता आहे. मागील काही महिन्यांपासून जागतिक आरोग्य संघटनेकडे याबाबत पाठपुरवठा सुरू आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेची बुधवार, 3 नोव्हेंबर रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत आपल्या लसीला आपत्कालीन मान्यता मिळेल, अशी अपेक्षा भारत बायोटेक कंपनीला आहे. हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीने लसीच्या मंजुरीसाठी 19 एप्रिल रोजी डब्ल्यूएचओकडे अर्ज केला होता.









