नवी दिल्ली / वृत्तसंस्था
डब्लिन-आयर्लंडमध्ये आयोजित यू-23 महिला हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व वैष्णवी फाळके हिच्याकडे सोपवले गेले. 5 संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेसाठी उपकर्णधारपद मुमताज खानकडे असेल. बुधवारी हॉकी इंडियाने 20 सदस्यांचा संघ जाहीर केला. ही स्पर्धा दि. 19 ते 26 जून या कालावधीत खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत भारतासह नेदरलँड्स, आयर्लंड, अमेरिका व युक्रेनचा समावेश असणार आहे. भारताची सलामी लढत यजमान आयर्लंडविरुद्ध दि. 19 जून रोजी खेळवली जाईल. त्यानंतर नेदरलँड्स (20 जून), युक्रेन (22 जून), अमेरिकाविरुद्ध (23 जून) अन्य सामने होणार आहेत. भारताचा हाच संघ त्यापूर्वी दि. 4 व 5 जून रोजी स्वित्झर्लंडमध्ये आयोजित एफआयएच हॉकी फाईव्ह्ज स्पर्धेतही भाग घेणार आहे.









