वृत्तसंस्था / मुंबई :
भारतीय शेअर बाजाराने सध्या जगातील अन्य शेअर बाजारांच्या तुलनेत विशेष कामगिरी केली आहे. यामध्ये राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीने मागील तीन महिन्यात 35.2 टक्के इतका लाभ गुंतवणूकदारांना दिला आहे.
मागील तीन महिन्यात भारताचे एकूण बाजारीमूल्य 530 अब्ज डॉलरने वाढून 1.8 ट्रिलियन डॉलरच्या घरात पोहोचले आहे. याच दरम्यान अमेरिकन शेअर बाजारांनी 28 टक्के परतावा दिला आहे तर जपानच्या बाजाराने 25 टक्के परतावा दिला असून जर्मनी 29 टक्के आणि फ्रान्सच्या बाजाराने 18टक्के परतावा दिला आहे. या सर्वांच्या कामगिरीत भारतीय बाजाराने बाजी मारली असल्याचे पहावयास मिळाले.
लॉकडाऊनच्या अगोदर भारतीय इक्विटी बाजाराचे बाजारीमूल्य 2.12 ते 2.20 ट्रिलियन डॉलरच्या दरम्यान होते. याच दरम्यान विदेशी पोर्टफोलियो गुंतवणुकदारांनी भारतीय इक्विटी बाजारामध्ये मार्च महिन्यात विक्रमी 61,972 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली होती. मागील तीन महिन्यात या गुंतवणुकदारांनी 44,402 कोटी रुपयांच्या समभागाची खरेदी केली आहे.









