उद्योगपती अंबानी-झुकरबर्ग यांच्यातील चर्चेदरम्यान मुकेश अंबानींचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय अर्थव्यवस्था आता कोरोनाच्या संकटातून काही प्रमाणात सावरण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक क्षेत्रात आलेल्या नुकसानीसोबत काही निवडक क्षेत्रातील तेजीमुळे अर्थव्यवस्थेची घसरण काही प्रमाणात सावरत असल्याचे पहावयास मिळत आहे.
याच पार्श्वभूमिवर देशाची अर्थव्यवस्था येत्या 20 वर्षात जगातील प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून स्थान प्राप्त करणार असल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) कंपनीचे अध्यक्ष आणि देशातील सर्वात धनाढय़ व्यावसायिक मुकेश अंबानी यांनी मंगळवारी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्यात झालेल्या व्हिडीओ चर्चेवेळी मत व्यक्त केले आहे.
भारत कोरोना महामारीच्या संकटातही काही प्रमाणात सावरत आहे. याचाच भाग म्हणून येत्या काळातही अर्थव्यवस्था मजबूत स्थिती प्राप्त करणार असल्याचे मत ‘फ्यूल फॉर इंडिया-2020’च्या व्हर्चुअल परिषदेत अंबानी यांनी व्यक्त केले आहे.
मजबूत डिजिटलायझेशन
जगात प्रत्येक टप्प्यावर आता डिजिटल पातळीवर बदल होत आहेत. यामुळे जगातील सर्वात मोठी लोकशाहीची भूमिका निभावत असणारा भारत हा डिजिटलायझेशनच्या मदतीने प्रत्येक व्यक्तीला सशक्त बनविण्याचे काम करत असल्याचा विश्वास झुकरबर्ग यांनी व्यक्त केला आहे.
दोघा दिग्गजांच्या परिषेदेमध्ये बोलताना झुकरबर्ग यांना रिलायन्स जिओमधील गुंतवणूक करण्याचे कारणही विचारले असता यावर झुकरबर्ग यांनी भारत आर्थिक क्षेत्रात आघाडीवरचा देश होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.









