केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे प्रतिपादन

वार्ताहर /दाभाळ
भारतीय प्राचीन संस्कृतीचे महत्त्व अनन्य साधारण असेच असून ऋषीमुनीनी आपल्या तपसाधनेच्या जोरावर अनेक असाध्य गोष्टी साध्य केल्या होत्या. हा महान वारसा पुढे नेण्याचे उत्तरदायित्व आपल्या सर्वांचे आहे. आध्यात्मिक मार्ग स्वीकारून पुढे गेल्यास जगाच्या उद्धारासाठी आपला देश पुन्हा विश्वगुरु होऊ शकतो, असा विश्वास केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला.
प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या फोंडा सेवा केंद्रातर्फे बेतोडा येथे नव्याने उभारण्यात येणाऱया राजयोगा मेडिटेशन केंद्राच्या भूमीपुजन सोहळय़ात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी विश्व हिंदू परिषद गोवा शाखेचे अध्यक्ष संतोष महानंदू नाईक, उद्योजक व समाजसेवक अभय प्रभू, निर्मल विश्व संस्थेचे अध्यक्ष कमलाकर साधले, सरपंच विशांत गावकर, पंचसदस्य सुशांत गावकर, चंद्रकांत सामंत, उपवनपाल संतोष फडते, ब्रह्माकुमारीजच्या गोवा प्रमुख शोभा बेहनजी, काणकोणच्या सुरेखा बेहनजी, सावंतवाडीच्या कांचन बेहनजी, डिचोलीच्या छाया बेहनजी, पर्वरीच्या वनिता बेहनजी, जुने गोवेच्या निर्माला बेहनजी आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यामिक क्षेत्रात ब्रह्माकुमारीजचे कार्य अतुलनीय असून माणसाला राजयोगाच्या माध्यमातून खऱया सुखाकडे नेण्याचा मार्ग या संस्थेतर्फे दाखविला जातो, असे श्रीपाद नाईक यांनी पुढे बोलताना नमूद केले. संतोष नाईक म्हणाले, अति हव्यासामुळे समाजातील माणुसकी व नितीमत्ता हरवत चालली असून सुखासाठी निवडलेला हा मार्ग दुःखाकडे घेऊन जात आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी अध्यात्म हा एकमेव शाश्वत मार्ग आहे.
कमलाकर साधले यांनी धनदौलत ही खरी संपत्ती नसून श्रेष्ठ व सकारात्मक विचारसरणी आपले जीवन बदलू शकते, असे नमूद केले. ब्रह्माकुमारीजचे समाज प्रबोधनाचे कार्य उच्च कोटीचे असल्याचे अभय प्रभू म्हणाले. बेतोडा निरंकाल सारख्या भागात अशा आध्यात्मिक केंद्रामुळे युवा पिढीला योग्य दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरपंच विशांत गांवकर यांनी ब्रह्माकुमारीजच्या या कार्याला पंचायतीचे नेहमीच सहकार्य असल्याचे सांगून त्यांच्या या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या. सुशांत गांवकर, चंद्रकांत सामंत यांचीही यावेळी भाषणे झाली. सुसंस्कृत, चारित्र्यवान समाज घडविण्यासाठी अध्यात्मिक ज्ञान आवश्यक असून हेच शिक्षण देण्याचा ब्रह्माकुमारीजचा प्रयत्न असल्याचे शोभा बेहनजी यांनी सांगितले. सुरेखा बेहनजी यांनी प्रास्ताविक तर गीता बेहनजी यांनी स्वागत केले. मान्यवरांच्याहस्ते विद्यालयाचा ध्वज फडकावण्यात आला व भूमीपुजन विधी पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौस्तुभ माड कामत यांनी तर मिनाक्षी बेहनजी यांनी आभार मानले.









