भारतात बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक अन् मृत्यूदर तुलनेत कमी : डीएनएमधील एसीई-2 रिसेप्टरवर विषाणूचा हल्ला आक्रमण
भारतात कोरोनाबाधितांची संख्या 56 लाखांहून अधिक झाली असून 90 हजारांच्या आसपास लोकांना जीव गमवावा लागला आहे. जगात अमेरिकेनंतर भारतातच सर्वाधिक रुग्ण आहेत. तरीही दिलासादायक बाब म्हणजे कोरोनातून बरे होण्याचे सर्वाधिक प्रमाण भारतातच आहे. देशाचा रिकव्हरी रेट 80 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तर देशातील मृत्यूदर सातत्याने कमी होऊ लागला आहे. भारतात मृत्यूदर इतका कमी का आहे? रिकव्हरी रेट सर्वाधिक का आहे या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी बनारस हिंदी विद्यापीठाचे प्राध्यापक ज्ञानेश्वर चौबे आणि त्यांचे पथक दीर्घकाळापासून संशोधन करत होते. या संशोधनात अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. भारतात लोकांची सेल्फ इम्युनिटीच कोरोनाला मात देत असल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाल्याचे प्राध्यापक चौबे यांनी म्हटले आहे.
एसीई-2 रिसेप्टर
कोरोना विषाणू सर्वप्रथम जीनमधील एसीई-2 रिसेप्टरवर हल्ला करतो. 60 टक्के भारतीयांमध्ये हे जीन अत्यंत मजबूत आहे. याचमुळे कोरोनाचा येथे मोठा प्रभाव पडत नसावा. तर युरोपीय आणि अमेरिकन लोकांमध्ये हे जीन केवळ 7 ते 14 टक्के लोकांमध्येच आढळून येते. कोरोनाचा प्रभाव पाश्चिमात्य देशांमध्ये अधिक आहे.
भारताचा रिकव्हरी रेट
भारतात कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट 80.86 टक्के आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढत चालला आहे. भारतात 10 लाख लोकसंख्येमागे 4031 बाधित सापडले आहेत. तर जगातील उर्वरित देशांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. पेरूमध्ये दर 10 लाख लोकसंख्येमागे 22,941 रुग्ण, ब्राझीलमध्ये 21,303 रुग्ण, अमेरिकेत 20,253 रुग्ण, कोलंबियात 14,749 रुग्ण आणि स्पेनमध्ये 14,749 रुग्ण सापडले आहेत.
मृत्यूदर घटतोय
भारतात 10 लाख लोकसंख्येमागे कोरोनाने सरासरी 64 मृत्यू झाले आहेत. स्पेनमध्ये हाच आकडा 652, ब्राझीलमध्ये 642, ब्रिटनमध्ये 615, अमेरिकेत 598, मेक्सिकोत 565, फ्रान्समध्ये 477 आणि कोलंबियात 469 जणांना दर 10 लाख लोकसंख्येमागे जीव गमवावा लागला आहे. जगातील 10 लाख लोकसंख्येमागे सरासरी 123 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
संशोधनाचा निष्कर्ष

विविध देशांमधील नागरिकांचे जीनोम या अध्ययनासाठी जमविण्यात आले होते. यात भारतात समूह प्रतिकारकशक्तीपेक्षा अधिक कोरोना प्रतिरोधक क्षमता पूर्वीपासूनच लोकांच्य जीनमध्ये असल्याचे संशोधनात दिसून आले. ही क्षमता लोकांच्या शरीरातील पेशींमधील एक्स क्रोमोसोमच्या जीन एसीई-2 रिसेप्टरद्वारे मिळते. याचमुळे कोरोना विषाणूला पेशींमध्ये प्रवेशापासून रोखले जाते. या म्युटेशनचे नाव आरएस-2285666 असे आहे. भारताच्या लोकांचा जीनोम अत्यंत चांगल्याप्रकारे निर्माण झाला आहे. येथे लोकांच्या जीनोममध्ये अनेक युनिक टाईपचे म्युटेशन आहेत, याच कारणामुळे देशातील मृत्यूदर कमी आणि रिकव्हरी रेट सर्वाधिक असल्याचे जीवाणूशास्त्राचे प्राध्यापक चौबे यांनी म्हटले आहे.
चुकीच्या माहितीपासून सतर्क

काही लोक कोरोना विषाणूसंबंधी चुकीची माहिती फैलावत असून यामुळे महामारी रोखण्याच्या कामात अडथळे निर्माण होत असल्याचा दावा संयुक्त राष्ट्रसंघ महासचिव ऍण्टोनियो गुतेरेस यांनी केला आहे. महामारी स्पष्टपणे सार्वजनिक आरोग्य आणीबाणी आहे. चुकीची माहिती फैलावत राहिल्यास नुकसानच होणार असल्याचे गुतेरेस म्हणाले.
रशियात नवे निर्बंध

विदेशातून रशियात पोहोचणाऱया नागरिकांना कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत घरातच विलगीकरणात रहावे लागणार आहे. विदेशातून येणाऱया सर्व नागरिकांना 3 दिवसांच्या आत पीसीआर चाचणी करवून घ्यावी लागणार आहे. या चाचणीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत विलगीकरण सक्तीचे असल्याची माहिती रास्पोट्रेबनादजोरचे प्रमुख अन्ना पोपोवा यांनी गुरुवारी दिली आहे.
लसचाचणीसाठी नोंद करा

कोरोनावरील लसीकरता नोंदणी करण्याचे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लोकांना केले आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची चाचणी अंतिम टप्प्यात असून लोकांनी आता यात भाग घेण्यासाठी पुढे यावे. आम्ही लसीच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो असून ही देशासाठी आनंदाची बाब आहे. एफडीए लसीला मंजुरी देण्याप्रकरणी राजकीय विचारांनी प्रभावित होत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत कोरोनावरील लस उपलब्ध होणार असल्याचा दावा ट्रम्प यांनी यापूर्वीच केला आहे.
मानवी शरीरात जाणूनबुजून कोरोनाचा प्रवेश घडणार

कोविड चॅलेंज ट्रायल अंतर्गत जाणूनबुजून मानवी शरीरात कोरोना विषाणू सोडण्याचा प्रकार ब्रिटनमध्ये घडविला जाऊ शकतो. स्वयंसेवकांवर करण्यात येणाऱया या चाचणीचा उद्देश संभाव्य कोरोना लसीच्या प्रभावाची तपासणी करणे आहे. हा प्रयोग लंडनमध्ये करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. ब्रिटन सरकारने ह्युमन चॅलेंज स्टडीद्वारे लस निर्माण करण्यासंबंधी विचारविनिमय सुरू असल्याचे म्हटले आहे.
अशाप्रकारच्या कुठल्याही करारावर अद्याप स्वाक्षरी झालेली नाही. आम्ही आमच्या सहकाऱयांसोबत काम करत आहोत. ह्युमन चॅलेंज स्टडीद्वारे संभाव्य कोरोना लसीसंबंधी कशाप्रकारे सहकार्य केले जाऊ शकते हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही चर्चा कोरोनाचा संसर्ग रोखणे, त्याच्या उपचारासाठी केल्या जाणाऱया प्रयत्नांचा हिस्सा असल्याचे सरकारच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. पूर्ण जगात कोरोना विषाणूच्या खात्म्यासाठी लसीच्या विकासावर अत्यंत वेगाने काम केले जात आहे.
धोका देखील..
ब्रिटिश सरकारच्या या कोरोना चॅलेंज ट्रायलमध्ये भाग घेण्यासाठी मोठय़ा संख्येत देशातील तरुण आणि तंदुरुस्त स्वयंसेवक तयार आहेत. कोरोनावरील लस काम करते की नाही हे या चाचणीतून त्वरित समजणार आहे. याच्या माध्यमातून कोरोनासाठी सर्वाधिक प्रभावी लस लवकरात लवकर निवडता येणार आहे. चाचणीत भाग घेणाऱया लोकांची लंडनमध्ये 24 तास देखरेख केली जाणार आहे. हा प्रयोग जानेवारीमध्ये सुरू होऊ शकतो, असे मानले जात आहे.









