काबूल: तालिबानने काबुल ताब्यात घेतल्यानंतर अफगाणिस्तान सोडून जाण्यासाठी विमानतळावर नागरिकांची तोबा गर्दी होत आहे. यातच अफगाणिस्तान बाहेर जाण्यासाठी काबूल विमानतळावर थांबलेल्या १५० भारतीयांचे तालिबानने अपहरण केलं आहे. अफगाणि प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिलं आहे. ज्यांचं अपहरण झालय, त्यामध्ये १५० भारतीय नागरिक असल्याची माहिती आहे. पण तालिबान्यांच्या प्रवक्त्याने भारतीयांचे अपहरण केलं नसल्याचं म्हंटलं आहे. त्यांनी १५० भारतीयांना सुरक्षित विमानतळाच्या आतामध्ये घेऊन गेल्याचं म्हंटलं आहे. पण तालिबान्यांनी केलेला हा दावा कितपत सत्य आहे हे त्या १५० नागरिकांची सुटका झाल्यावरच समजेल.
दरम्यान अफगाणिस्तानातून मायदेशी परतण्यासाठी अनेक भारतीय नागरिक काबुल विमानतळावर वाट पाहात आहेत. आज भारतीय वायूसेनेचं एक विमान काबुल विमानतळावरुन ८५ नागरिकांना घेऊन येण्यासाठी रवाना झालं आहे. पण त्याआधीच काबुल विमानतळावरुन भारतीय नागरिकांना तालिबान्यांनी बाहेर काढल्याचं वृत्त अफगाणिस्तानतील माध्यमांमध्ये असल्याचं एएनआयनं म्हटलं आहे. भारत सरकार याबाबतची माहिती अद्याप घेत असून अपहरण झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
१५० भारतीयांचं अपहरणकेल्याच्या वृत्तानंतर दुसरीकडे तालिबानचा प्रवक्ता अहमदुल्ला वसेकनं भारतीय नागरिकांचं वृत्त फेटाळून लावलं आहे. अहमदुल्ला वसेकनं तालिबानकडून एक अधिकृत माहिती जारी केली आहे. भारतीय नागरिकांचं काबुल विमानतळावरुन अपहरण झाल्याचं वृत्त पूर्णपणे निराधार आहे. याउलट तालिबानकडून भारतीय नागरिकांना सुरक्षितरित्या विमानतळाच्या आत सोडण्यात आलं आहे, अशी माहिती अहमदुल्ला वसेकनं दिली आहे.