लस उपलब्ध होणार : 3,700 रुपयांपर्यंत असणार एक डोस : युरोपमध्ये लसीकरणाची तयारी
फायजर-बायोएनटेकच्या कोरोनावरील लसीला आपत्कालीन मंजुरी देणारा ब्रिटन पहिला देश ठरला आहे. अमेरिकेच्या कंपनीने आता भारत सरकारसोबत लससंदर्भात चर्चा सुरू असल्याचे म्हटले आहे. फायजरची लस भारतात साठविणे मोठे आव्हान ठरणार आहे. या लसीकरता उणे 70 अंश तापमानाची गरज भासते. तर रशियात पुढील आठवडय़ापासून सामूहिक लसीकरण कार्यक्रम सुरू होणार आहे.
भारतात येणार फायजरची लस
भारत सरकारसोबत चर्चा पुढे नेण्याची प्रतिबद्ध आहोत. जगभरातील सरकारांसोबत काम करत असून प्रत्येक देशात लस हाताळण्याच्या सुविधाविषयक गरजा समजून त्या हिशेबाने लॉजिस्टिक्सचे नियोजन केले जाणार आहे. भारतात लस उपलब्ध करविण्याचे मार्ग शोधावे लागणार असल्याचे उद्गार फायजरच्या प्रवक्त्या रोमा नायर यांनी काढले आहेत.
विकसित देश आघाडीवर
ब्रिटनसह अमेरिका आणि युरोपीय महासंघाने लसीचे कोटय़वधी डोस खरेदी करण्यासाठी आगाऊ खरेदी करार केले आहेत. अमेरिकेने 10 कोटी डोससाठी यापूर्वीच ऑर्डर दिली आहे. तर युरोपीय महासंघाने 20 कोटी डोसचीही मागणी नोंदवून ठेवली आहे. तर आणखी 10 कोटी डोस खरेदीसाठी करार केला जाणार आहे. भारताने फायजरसोबत त्याच्या लसीसाठी कुठलाच करार केलेला नाही. फायजर लसीचा प्रत्येक डोस सुमारे 2,950 ते 3,700 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.
रशियात पुढील आठवडय़ात लसीकरण
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी मॉस्कोमध्ये सरकारला पुढील आठवडय़ात सामूहिक लसीकरण सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. पुतीन यांनी एका ऑनलाईन बैठकीत आरोग्य कर्मचारी आणि शिक्षकांना अतिजोखीम गटात ठेवण्याचा आणि सर्वप्रथम लसीचा डोस देण्याचा आदेश उपपंतप्रधान तातयाना गोलीकोवा आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱयांना दिला आहे. राष्ट्रपतींनुसार काही दिवसांमध्ये 20 लाख डोस उपलब्ध होणार आहेत. रशियात आतापर्यंत 1 लाख लोकांना लस देण्यात आली आहे. रशियाच्या सैनिकांना लस देण्याचे काम सुरू झाले आहे. लवकरच 4 लाख सैनिकांना ही लस उपलब्ध करण्यात येणार असल्याचे रशियाच्या आरोग्य मंत्र्याने म्हटले आहे. रशियाने दोन लसी विकसित केल्या आहेत. स्पुतनिक-5 आणि एपिवॅककोरोना या लसींसह तिसऱया लसीच्या चाचण्या 2020 च्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
इटलीत लसीकरण योजना जाहीर
इटलीने राष्ट्रीय स्तरावर स्वतःची नॅशनल कोविड-19 वॅक्सिनेशन कॅम्पेन घोषित केली आहे. पहिल्या टप्प्यात 2021 च्या पहिल्या तिमाहीपर्यंत 4 कोटी लोकांसाठी 20.2 कोटी डोस उपलब्ध होणार आहेत. ही लस मोफत आणि स्वैच्छिक असणार असल्याची घोषणा इटलीच्या आरोग्य मंत्री रॉबर्ट स्पेरंजा यांनी केली आहे.
आरोग्यमंत्र्यांनुसार फायजर लसीचे पहिले डोस 23-26 जानेवारीदरम्यान उपलब्ध होणार आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये 300 पेंद्रांद्वारे ही लस देण्या येणार आहे. मोहिमेत सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱयांना सामील करण्यात येईल. त्यानंतर वृद्धांना ही लस देण्यात येणार आहे. पुढील गटात शाळांसमवेत अत्यावश्यक क्षेत्रातील अन्य कर्मचाऱयांना व्यापले जाणार आहे.
लसविषयक भीती दूर करण्यासाठी माजी अध्यक्ष सरसावले

अमेरिकेतही पुढील आठवडय़ापासून लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील नागरिकांची लससंदर्भातील भीती दूर करण्यासाठी तीन माजी अध्यक्ष बराक ओबामा, जॉर्ज डब्ल्यू बुश आणि बिल क्लिंटन जाहीरपणे लस टोचून घेणार आहेत. या कृत्यामुळे लसीची सुरक्षितता आणि प्रभावीपणासंबंधी लोकांदरम्यान चांगला संदेश जाणार असल्याची तिघांनाही अपेक्षा वाटत आहे. तर जपान आणि फिनलंडने पूर्ण देशात लस मोफत उपलब्ध करविण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेत 15 डिसेंबरपूर्वी कोरोनावरील लसीकरण

अमेरिकेत कोरोना लस विकास कार्यक्रमाच्या प्रमुख सल्लागारांना फेब्रुवारीपर्यंत 10 कोटी लोकांना लस मिळणार असल्याची अपेक्षा आहे. या मोहिमेत अतिजोखीमयुक्त लोकसंख्येला सर्वप्रथम सामील करण्यात येणार आहे. यात वृद्ध, आरोग्य कर्मचारी आणि कोमॉर्बिडिटिज असणारे लोक सामील असतील. 10 किंवा 11 डिसेंबर रोजी किमान एका लसीला आपत्कालीन मंजुरी मिळण्याची अपेक्षा असल्याचे ऑपरेशन वॉर्प स्पीडचे प्रमुख सल्लागार मोनसेल स्लॉई यांनी म्हटले आहे. फायजर आणि मॉडर्नाच्या लसींनी आपत्कालीन मंजुरीसाठी अर्ज केला आहे. दोन्हींच्या वैद्यकीय चाचण्यांचा डाटा अत्यंत चांगला राहिला आहे. जॉन्सन अँड जॉन्सनकडूनही चांगली बातमी येण्याची अपेक्षा आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या क्लीनिकल ट्रायल्सच्या अंतिम टप्प्यात 28 हजार स्वयंसेवकांना लस देण्यात आली आहे.









