रशियाकडून 2025 मध्ये एस-400 यंत्रणा सुपूर्द होणार, भारताने पाच यंत्रणांची केली आहे मागणी, कॅमॉव्ह हेलिकॉप्टर करारही मार्गी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अत्याधुनिक एस-400 या दीर्घ पल्ल्याच्या जमिनीवरून आकाशात मारा करणाऱया मिसाईल यंत्रणेचे उत्पादन रशियाने भारतासाठी सुरू केले आहे. रशिया आणि भारत यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही महत्त्वाची माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेत रशियाचे भारतातील राजदूत निकोलाय कुदाशेव्ह तसेच रशियाचे उपनेते रोमन बाबुश्कीन यांनी या यंत्रणेची माहिती सांगितली.
भारत रशियाकडून अशा पाच यंत्रणा विकत घेणार आहे. या यंत्रणांमुळे भारताच्या मारक शक्तीत प्रचंड वाढ होणार असून भारतावर विमान हल्ला झाल्यास त्यापासून संरक्षणासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे. ही यंत्रणा स्वयंचलित असून शत्रूच्या विमानांचा शोध घेण्यापासून त्यांना पाडविण्यापर्यंतची सर्व कामे ही यंत्रणा स्वबळावर करू शकते. या यंत्रणेमुळे पाकिस्तान आणि चीन या दोन्ही सीमावर्ती देशांचा एकाचवेळी सामना करणेही भारतासाठी शक्मय होणार आहे.
या यंत्रणेचे नाव ‘ट्रायम्फ’ असे ठेवण्यात आले आहे. भारतावर हल्ला करणारी शत्रूची विमाने आणि ड्रोन्स यांचा 400 किलोमीटर अंतरावरून पत्ता लावण्याची क्षमता यात आहे. ही यंत्रणा रशियाची सर्वात आधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणा मानली जाते. जगात अशी यंत्रणा असणारे केवळ तीन देश आहेत.
अमेरिकेचा विरोध नाही
भारताने रशियाकडून ही यंत्रणा विकत घेतल्यास अमेरिका विरोध कायद्यांतर्गत भारतावर कारवाई केली जाईल, असा इशारा अमेरिकेने दिला होता. भारतावर आर्थिक निर्बंध देखील लागू केले जाऊ शकतात, असे अमेरिकेने स्पष्ट केले होते. तथापि, काही दिवसांपूर्वी अमेरिकेने अशी कारवाई न करण्याचे संकेत दिले आहेत. भारत आणि रशिया यांचे संबंध अबाधित राखून भारताशी घनि÷ मैत्री करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असेल, अशी स्पष्ट घोषणा त्या देशाने केली होती. त्यामुळे एस-400 क्षेपणास्त्र यंत्रणा विकत घेतल्यामुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये बाधा येण्याची शक्मयता दुरावली आहे, असे तज्ञांचे मत आहे.
कॅमॉव्ह हेलिकॉप्टर्सही मिळणार
2016 मध्ये भारत आणि रशिया यांच्यात कॅमॉव्ह हेलिकॉप्टर्सची संयुक्तरित्या निर्मिती करण्याचा करार करण्यात आला होता. भारत, रशियाकडून कॅमॉव्ह केए 226टी जातीची दोनशे हेलिकॉप्टर्स घेणार असून कालबाहय़ ठरत चाललेल्या चित्ता आणि चेतक हेलिकॉप्टर्सची जागा ही नवी हेलिकॉप्टर्स घेणार आहेत. यापैकी 60 हेलिकॉप्टर्स रशिया तयार अवस्थेत देणार आहे. तर 140 हेलिकॉप्टर्सची निर्मिती हिंदुस्थान एअरोनॉटिक्समध्ये रशियाच्या तांत्रिक सहकार्याने केली जाणार आहे.
मोदी-पुतीन करार साकारणार
गेल्या सप्टेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्या वार्षिक शिखर बैठकीत दोन्ही देशांमध्ये संरक्षण सहकार्य वाढविण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी वेगवान पद्धतीने केली जाईल, असे दोन्ही देशांनी म्हटले आहे. यंदा लखनौ येथे होणाऱया डिफेन्स एक्स्पोमध्ये 50 सदस्यांचे रशियन शिष्टमंडळही सहभागी होईल, असे बाबुश्कीन यांनी स्पष्ट केले. या डिफेन्स एक्स्पोमध्ये रशिया सर्वात मोठा भागीदार असेल.