मलेशियाच्या पंतप्रधानांचा तोरा उतरला : पामतेलाची आयात बंद
वृत्तसंस्था/ क्वालांलपूर
भारताकडून पामतेलाच्या आयातीत कपात करण्यात आल्यावर मलेशियाचा तोरा उतरला आहे. मागील काही काळापासून भारतविरोधी भूमिका घेणारे मलेशियाचे पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी भारताच्या विरोधात कुठल्याही प्रकारची प्रत्युत्तरादाखल कारवाई करणार नसल्याचे सोमवारी म्हटले आहे. भारताचा सामना करण्याचे बळ मलेशियामध्ये नसल्याने याप्रकरणी तोडगा काढण्याचा प्रयत्न चालल्याचे महातिर म्हणाले.
मलेशियाने सातत्याने काश्मीर आणि नागरिकत्व सुधारणा कायद्यासंबंधी विधाने केल्याने भारताने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच भारताने मलेशियाकडून होणाऱया पामतेलाच्या आयातीवर अप्रत्यक्ष स्वरुपात बंधने घातली आहेत.
सूडाच्या भावनेने कारवाई करण्यासाठी आम्ही अत्यंत छोटे देश आहोत. या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी एखादा तोडगा काढावा लागणार असल्याचे मोहम्मद यांनी म्हटले आहे. मलेशिया हा पामतेलाचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. भारताने आयात रोखल्यावर मलेशियातील पामतेलाचे दर 11 वर्षांच्या नीचांकी स्तरावर पोहोचले आहेत.
किमती घटल्याने मलेशियाला मोठा फटका बसला असून तो आता भारताशी चर्चा करण्याचे मार्ग शोधत आहे. भारताच्या एकूण खाद्यतेलातील एक तृतीयांश हिस्सा पामतेलाचा असतो. भारत वर्षाकाठी सुमारे 90 लाख टन पामतेलाची आयात करतो. यातील बहुतांश आयात इंडोनेशिया आणि मलेशियाकडून केली जाते.
पुढील आठवडय़ात चर्चा
पुढील आठवडय़ात दावोस येथे होणाऱया वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीच्या व्यतिरिक्त मलेशियाचे वाणिज्यमंत्री डारेल लेइकिंग हे भारताचे वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा करू शकतात. मलेशियाच्या विरोधात भारताने कुठलीच कारवाई केली नसल्याचे गोयल यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रसंघ महासभेत मलेशियाच्या पंतप्रधानांनी काश्मीरसंबंधी अत्यंत आक्षेपार्ह विधान केले होते.