बिजींग / वृत्तसंस्था
भारताबरोबरचे सर्व मतभेद सामोपचाराच्या मार्गाने मिटवून समझोता करण्यास तयार असल्याचे संकेत चीनने दिले आहेत. भारताची राजकीय विश्वासाचे वातावरण निर्माण करून दीर्घकालीन द्विपक्षीय संबंध सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. असे चीनच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते झाओ लिजान यांनी सोमवारी स्पष्ट केले.
सध्या चीन आणि भारत यांच्यात लडाख येथे सीमावाद उफाळून आला आहे. गालवन खोऱयानजीक काही आठवडय़ांपूर्वी झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे 20 सैनिक हुतात्मा झाले होते. तसेच चीनचेही अनेक सैनिक ठार झाले होते. तेव्हापासून हा संघर्ष धुमसतच आहे. पूर्व लडाख सीमेवर अनेक ठिकाणी भारत आणि चीन यांचे सैनिक अद्यापही एकमेकांसमोर उभे आहेत. दोन्ही देशांनी मोठय़ा प्रमाणावर सैनिकांची व शस्त्रांची नियुक्तीही केली आहे.
आताच सौम्यता कशासाठी
अशा स्थितीत दोन्ही देशांच्या ज्येष्ठ सेनाधिकाऱयांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱया होऊनही तोडगा निघालेला नाही. आता चीनने समझोत्याची भाषा करण्याला महत्वाचे आंतरराष्ट्रीय संदर्भही आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या डेमॉक्रेटिक पक्षाने निवडणूक वचनपत्र सादर केले. त्यात भारताशी असलेले सुदृढ संबंध अधिक बळकट केले जातील तसेच सीमेपलिकडून होणारा दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन करण्यात आले होते. तसेच चीनचा उल्लेख करून त्याचा भारतासह इतर शेजाऱयांविरूद्धचा आक्रमकपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला होता. त्यामुळे चीनने आता काहीसा नरमाईचा सूर लावला आहे. पण त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवता येत नाही. तो कृती काय करतो हेच महत्वाचे आहे, असे विश्लेषण अनेक तज्ञांनी केले आहे.









