डेमोक्रेटिक पार्टीचे आश्वासन : ज्यो बिडेन यांना उमेदवारी
वृत्तसंस्था/ अमेरिका
नोव्हेंबर महिन्यात होणाऱया अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी डेमोक्रेटिक पार्टीने पॉलिसी स्टेटमेंट प्रसिद्ध केले आहे. ज्यो बिडेन हे अध्यक्ष तर कमला हॅरिस यांना डेमोक्रेटिक पार्टीने उपाध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. सत्तेवर आल्यावर अवलंबिली जाणारी संभाव्य धोरणे पॉलिसी स्टेटमेंटमध्ये नमूद असतात. भारताशी उत्तम संबंध निर्माण करण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे. दक्षिण आशियात सीमेपलिकडून होणाऱया दहशतवादी हल्ल्यांना सहन केले जाणार नसल्याचे डेमोक्रेटिक पार्टीने म्हटले आहे.
या स्टेटमेंटमध्ये दक्षिण आशियाचा उल्लेख प्रामुख्याने करण्यात आला आहे. या क्षेत्रात भारत आणि पाकिस्तान या दोघांचाही समावेश आहे. बराक ओबामा यांच्या कार्यकाळातच अमेरिकेने पाकिस्तानच्या विरोधात पावले उचलण्यास प्रारंभ केला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी या धोरणाला अधिकच पुढे नेले आहे. तर डेमोक्रेटिक पार्टीने आता बिडेन यांच्या धोरणांचे चित्रही स्पष्ट केले आहे.
सीमेपलिकडून होणारा दहशतवाद सहन केला जाणार नसल्याचे म्हणत डेमोक्रेटिक पार्टीने पाकिस्तानला गंभीर इशारा दिला आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो तसेच त्यांना मदत करत असल्याचे भारताने अनेकदा पुराव्यांसकट जगाच्या निदर्शनास आणले आहे.
व्हिसाविषयक सुधारणा
भारत आणि अमेरिकेच्या प्रशासनादरम्यान अनेकदा एच-1बी व्हिसावरून मतभेद होत राहिले आहेत. परंतु पहिल्यांदाच एखाद्या पक्षाने यावरील दृष्टीकोन तसेच धोरणाचे संकेत दिले आहेत. अतिकुशल एच-1बी व्हिसाधारकांची नोकरी तसेच त्यांच्या संख्येची काळजी घेतली जाणार आहे. या व्हिसाधारकांना कुटुंबीयांना सोबत ठेवण्यासंबंधी धोरणे निर्माण केली जाणार आहेत. द्वेषगुन्हे रोखण्यासाठी एक वेगळा विभाग निर्माण केला जाणार असल्याचे डेमोक्रेटिक पार्टीने म्हटले आहे.
चीनच्या नाडय़ा आवळणार
या दस्तऐवजात चीनचा उल्लेख करण्यात आला आहे. हिंदी महासागरासंबंधीचे धोरण अत्यंत स्पष्ट राहणार आहे. नियम-कायद्यांचे पालन करावेच लागेल. चीन स्वतःच्या शेजाऱयांना धमकावू शकणार नाही. भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश मिळून जगातील मोठे मुद्दे सोडविण्याचा प्रयत्न करणार आहेत. भारतीय-अमेरिकन समुदायाचे स्वतःचे असे वेगळे महत्त्व आहे. त्यांच्या मुद्दय़ांवर लक्ष दिले जाणार आहे. दोन्ही देशांमध्ये जगातील मोठी लोकशाही नांदत असल्याचे दस्तऐवजात नमूद करण्यात आले आहे.









