अमेरिकेसोबत महत्त्वाचा करार : ‘सी-130 जे सुपर हर्क्युलस’साठी सुटे भाग, सेवा देण्यास पेटागॉनची अनुमती
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
सी-130 जे सुपर हर्क्युलस मालवाहू विमानांच्या ताफ्याकरिता 90 दशलक्ष डॉलर्स किमतीची उपकरणे, सुटे भाग आणि लॉजिस्टिक सहकार्य देण्याच्या भारताच्या विनंतीला पेंटागॉनने मान्यता दिली असून एक महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून याकडे पाहिले जात आहे.
संरक्षण सुरक्षा सहकार्य यंत्रणेने काँग्रेसला दिलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, प्रस्तावित विक्री अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणास व राष्ट्रीय सुरक्षेस पोषक असून यातून अमेरिका-भारत धोरणात्मक संबंध दृढ होण्यास मदत होईल. यातून संरक्षणविषयक प्रमुख भागीदाराची सुरक्षा सुधारेल, जी इंडो-पॅसिफिक आणि दक्षिण आशिया प्रदेशातील राजकीय स्थिरता, शांतता आणि आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण शक्ती आहे.
याअंतर्गत भारताने एक अतिरिक्त प्रगत रडार वॉर्निंग रिसिव्हर चिपसेट, एक अतिरिक्त काऊंटरमेजर्स डिस्पेन्सर सिस्टम चिपसेट, दहा वजनाने हलक्या नाईट व्हिजन बायनाक्युलर, दहा नाईट व्हिजन गॉगल, जीपीएस आणि इलेक्ट्रॉनिक युद्धसामग्री मागविली आहे.
सदर अधिसूचनेनुसार प्रस्तावित विक्रीमुळे पूर्वी खरेदी केलेली विमाने भारतीय हवाई दल, नौदल व लष्कर यांच्या गरजांची पूर्तता, स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मानवतावादी मदत मोहिमा आणि प्रादेशिक आपत्तीच्या वेळी मदत याबाबतीत प्रभावीपणे कार्य करू शकतील. सुटे भाग आणि सेवांच्या या विक्रीमुळे भारतीय हवाई दलाला उच्चस्तरीय मोहिमेसाठी सज्ज ताफा सदैव राखणे शक्मय होईल.
हा अतिरिक्त आधार आत्मसात करण्यात भारताला कोणतीही अडचण येणार नाही. तसेच या उपकरणे व सेवांच्या प्रस्तावित विक्रीमुळे संबंधित प्रदेशातील लष्करी समतोल बदलणार नाही, असेही त्यात म्हटले आहे. संरक्षण क्षेत्रातील प्रमुख कंपनी लॉकडिह-मार्टीन यांच्यामार्फत ही विक्री होईल. अमेरिकेने सी-130 जे सुपर हर्क्युलस विमानांची ज्यांना विक्री केली आहे अशा 17 देशांपैकी भारत एक आहे. भारतीय हवाई दल सध्या 5 सी-130 जे-30 विमान चालविते. त्याशिवाय अतिरिक्त सहा सी-130 जे -30 एस सुपर हर्क्युलस विमानांची ऑर्डर दिली गेली आहे.









