बॉम्बर विमाने सीमेवर तैनात ः भारताचीही आता रोखठोक प्रत्युत्तराची तयारी
@ बीजिंग / वृत्तसंस्था
चिनी सैन्याने सीमेवर बॉम्बर विमाने तैनात करत पुन्हा एकदा भारताला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या आठवडय़ात, 11 नोव्हेंबर रोजी पीपल्स लिबरेशन आर्मीने हवाई दलाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त, चायना सेंट्रल टेलिव्हिजनने हिमालयाजवळ उड्डाण करणाऱया या एच-6के बॉम्बरचे फुटेज देखील प्रसिद्ध केले होते. ही विमाने सीजे-20 लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असून राजधानी दिल्लीसह विविध हवाईतळ त्यांच्या टप्प्यात असल्याचे भासवले जात आहे. तथापि, आता भारतानेही चीनच्या रणनीतीला टक्कर देण्यासाठी आपली वेगळी मोहीम सुरू केली आहे. मात्र, या मोहिमेबाबत कोणतेही उघड भाष्य किंवा स्पष्टीकरण सुरक्षा यंत्रणांकडून देण्यात आलेले नाही.
चीनने बीजिंगमध्ये असलेली आपली लढाऊ विमाने शिनजियांग भागात तैनात केल्याचा दावा ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने केला आहे. हा भाग भारत आणि चीनमध्ये वाद असलेल्या ठिकाणाजवळ असल्यामुळे भारताला हा इशारा असल्याचेही त्यात स्पष्टपणे म्हटले आहे. यापूर्वी बॉम्बर विमानांवर अनेक कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे बसवण्यात आली होती, परंतु आता भारताला टार्गेट करण्यासाठी सुधारित आवृत्त्यांमध्ये लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे जाणीवपूर्वक बसवण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
यावषी जूनमध्ये चीनने लडाखजवळील भागात स्टेल्थ बॉम्बर जेट एच-20 ची चाचणी केली. या जेटमध्ये रडारच्या कक्षेत न येता लक्ष्य नष्ट करण्याची क्षमता आहे. हे स्टेल्थ बॉम्बर अनेक आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. पण, ते अण्वस्त्र हल्ला करू शकतो की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आतापर्यंत चर्चेच्या 13 फेऱया
भारत आणि चीनमध्ये लष्करी कमांडर स्तरावर आतापर्यंत 13 फेऱया झाल्या आहेत. भारतीय लष्कराने चीनला एलएसी आणि इतर विवादित भागांच्या संदर्भात अनेक सूचना केल्या, परंतु चीनने ते मान्य न केल्यामुळे या चर्चेतून अंतिम तोडगा निघालेला दिसत नाही.









