वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टी-20 क्रिकेटवर पॉवरहिटिंगचे राज्य चालत असल्याने भारतालाही अशा फलंदाजांची गरज असून गोलंदाजी करू शकणारे फलंदाज मिळाल्यास भारतीय संघ अधिक समतोल होईल, असे भारताचे माजी कर्णधार व फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांनी सुचविले आहे.
टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताची यथेच्छ धुलाई करीत दणदणीत विजयासह अंतिम फेरीत स्थान मिळविले. या सामन्यात भारतीय फलंदाजांची संथ फलंदाजी सर्व स्तरातून टीकेचे लक्ष्य बनली आहे. ‘आम्ही नेहमीच म्हणतो की गोलंदाजांना थोडीफार फलंदाजीही करता आली पाहिजे. पण भारतीय क्रिकेटला सध्या गोलंदाजी करू शकणाऱया फलंदाजांची जास्त गरज असल्याचे मला वाटते. यामुळे संघही समतोल होईल,’ असे त्यांनी म्हटल्याचे एका क्रीडावाहिनीने सांगितले.
इंग्लंड संघात असेच खेळाडू असल्याने त्यांच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यांनी लिव्हिंगस्टोनचा उपयोग केला तर मोईन अलीला फारशी गोलंदाजी करायला मिळाली नाही. असे पर्याय आपल्या संघात असण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. संघनिवड सदोष असून या प्रवाहात बदल होण्याची गरज असल्याचे त्यांना वाटते. ‘दुर्दैवाने अ संघातही गोलंदाजी न करू शकणारे फलंदाज निवडले जातात. या स्तरावरच दोन्ही काम करू शकणारे खेळाडू निवडायला हवेत. पद्धतशीरपणे ही प्रक्रिया राबवली पाहिजे,’ असे ते म्हणतात.
2024 मध्ये विंडीजमध्ये होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेआधी अनुभव मिळण्यासाठी युवा खेळाडूंना जगभरातील विविध टी-20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी द्यायला हवी. आयपीएल सुरू झाल्यानंतर जगभरातील अनेक देशांनी त्यांचे स्वतःच्या लीग्स सुरू केल्या आहेत. आयपीएलमध्ये विविध देशांचे खेळाडू सहभागी होतात. पण बीसीसीआय विद्यमान भारतीय खेळाडूंना विदेशातील लीगमध्ये खेळण्याची परवानगी देत नाही. त्यांना परवानगी दिल्यास त्यांना नवा अनुभव मिळू शकतो. आयपीएलमध्ये खेळण्याने विदेशी खेळाडूंचा खेळ विकसित झाला आहे, तसा अनुभव भारतीय खेळाडूंनाही येऊ शकतो, असे कुंबळे म्हणाले.









