हल्ल्याच्या भीतीपोटी केली होती अभिनंदन यांची सुटका : पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांची कबुली
इस्लामाबाद / वृत्तसंस्था
पाकिस्तानात असलेला भारताचा दरारा पुन्हा एकदा दिसून आला आहे. भारत हल्ला करेल या भीतीपोटीच भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका करण्यात आल्याचा खुलासा पकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री ख्वाजा मोहम्मद असिफ यांनी केला आहे. पाकिस्तानच्या संसदेत असिफ यांनी केलेल्या वक्तव्यातून भारताचा दरारा आणि पाकिस्तानच्या मनात असलेली भीती स्पष्ट झाली आहे.
फेब्रुवारी 2019 मध्ये पाकिस्तानने भारतावर हल्ल्यासाठी लढाऊ विमाने पाठवली होती. त्यांचा हल्ला परतवून लावण्यासाठी भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मिग 21 ने उड्डाण केले. पाकिस्तानच्या विमानांना परतवून लावत असताना त्यांचे विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले आणि पाकिस्तानी लष्कराने त्यांना ताब्यात घेतले होते. अभिनंदन यांच्या सुटकेसाठी भारताने पाकिस्तानवर दबाव टाकला होता. त्यानंतर अभिनंदन यांची सुटका करण्यात आली होती. त्यावेळी पाकिस्तानने भारताकडून हल्ला होण्याच्या भीतीने अभिनंदन यांची सुटका केल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री आणि तत्कालीन लष्करप्रमुख यांची भीतीने गाळण उडाली होती, हे पाकिस्तानी संसदेत करण्यात आलेल्या खुलाशावरून दिसून येत आहे.
भारत हल्ला करेल ही चिंता पाकिस्तानला सतावत होती. या हल्ल्याची भीती त्यांच्या मनात होती. त्यामुळे भारताला शांत करण्यासाठी अभिनंदन वर्धमान यांची सुटका करण्यात आल्याचे असिफ यांनी सांगितले. पाकिस्तानच्या संसदेचे माजी अध्यक्ष अयाज सादिक यांनीही त्यावेळी भारताकडून असलेल्या हल्ल्याच्या धोक्याबाबत माहिती दिली होती. पाकिस्तानच्या संसदेतच भारताचा असलेला दरारा आणि भीती स्पष्ट झाली आहे. त्यावेळी पाकिस्तानने कितीही दर्पोक्ती केली असली तरी तो मनातून घाबरलेला होता, हे स्पष्ट झाले आहे.
लष्करप्रमुखांना भरली होती धडकी
भारत हल्ला करेल या भीतीने तत्कालीन लष्करप्रमुख कमर बाजवा यांना धडकी भरली होती. भीतीने त्यांचे पाय लटपटत होते. भीतीपोटी ते घामाघूमही झाले होते. त्यांच्या चेहऱयावर भीती स्पष्ट दिसत होती, असे सादिक यांनी स्पष्ट केले आहे. अभिनंदन यांची सुटका केली नाही, तर भारत एका रात्रीत पाकिस्तानवर हल्ला करू शकेल अशी भीती त्यांना होती. त्या भीतीने परराष्ट्रमंत्री शाह मेहमूबद कुरेशी थरथरत होते. ‘खुदा के वास्ते उसे जाने दो’, असे अभिनंदनबाबत ते बोलल्याचेही उघड झाले आहे. त्यांच्या या वक्तव्यातून त्यांना भारताबाबत असलेली हल्ल्याची भीती दिसत होती.









