इंग्लंडचे कडवे आव्हान मोडीत, सुर्यकुमार, पंडय़ाची फटकेबाजी, भुवनेश्वर सामनावीर, विराटला मालिकावीर पुरस्कार
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
कर्णधार विराट कोहली (52 चेंडूत नाबाद 80) व रोहित शर्मा (34 चेंडूत 64) यांनी आक्रमक अर्धशतके झळकावल्यानंतर भारताने येथील पाचव्या व शेवटच्या टी-20 सामन्यात इंग्लंडविरुद्ध सहज विजय संपादन केला आणि 5 सामन्यांची ही मालिका 3-2 फरकाने जिंकली. ऑक्टोबरमधील टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही मालिका विश्वचषकाची ड्रेस रिहर्सल म्हणून ओळखली गेली. यात विजय मिळवत भारताने आपली योग्य दिशेने घोडदौड होत असल्याचे संकेत दिले आहेत.
या लढतीत प्रारंभी, भारताने 2 गडय़ांच्या बदल्यात 224 धावांचा डोंगर रचला. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ विजयापासून बराच दूर राहिला. एकवेळ जोस बटलर (34 चेंडूत 52) व डेव्हिड मलान (46 चेंडूत 68) यांनी 130 धावांची भागीदारी साकारत भारताच्या तोंडचे पाणी पळवले होते. पण, 13 व्या षटकात ही जोडी फुटली आणि त्यानंतर त्यांना अंतिमतः 8 बाद 188 धावांवर समाधान मानावे लागले.
तत्पूर्वी, भारताच्या डावात सुर्यकुमार यादव (17 चेंडूत 32) व हार्दिक पंडय़ा (17 चेंडूत नाबाद 39) यांनीही उत्तम फटकेबाजी केली आणि यामुळे भारताला सव्वादोनशे धावांच्या उंबरठय़ावर अगदी सहजपणे पोहोचता आले. भारताने या लढतीत शेवटच्या 5 षटकात 67 धावांची आतषबाजी केली.
इंग्लिश कर्णधार मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि भारताने याचा पुरेपूर लाभ घेतला. भारताने येथे कर्णधार विराटला रोहितसमवेत सलामीला उतरवण्याची खेळी खेळली व ती फलुद्रूपही झाली. एकीकडे, रोहितने आपल्या नेहमीच्या शैलीत विस्फोटक फलंदाजी साकारली तर दुसरीकडे, विराट कोहलीने विशेषतः रोहित बाद झाल्यानंतर अधिक आक्रमणावर भर दिला.
रोहितने अवघ्या 34 चेंडूत 4 चौकार व 5 षटकारांसह आपली खेळी सजवली तर विराटने 52 चेंडूतच 7 चौकार व 2 उत्तूंग षटकारांची आतषबाजी केली. या जोडीने 9 षटकात 94 धावांची जोरदार सलामी देखील दिली. यापूर्वी, केएल राहुलवर पहिल्या चारही सामन्यात संघव्यवस्थापनाने विश्वास ठेवत त्याला खराब फॉर्ममध्येही संधी दिली होती. पण, अगदी चौथ्या लढतीपर्यंत त्याला एकदाही सूर न गवसल्याने अखेर या लढतीत भारतीय व्यवस्थापनाने त्याला वगळले आणि रोहित व विराट या जोडीला सलामीला उतरवले.
कर्णधार-उपकर्णधाराच्या या जोडीने प्रारंभापासूनच आक्रमणावर भर दिला होता आणि एकंदरीत या मालिकेत लवकर ब्रेकथ्रू मिळवण्याची सवय झालेल्या इंग्लिश संघाला जणू हा धक्काच सोसवला नाही. एकीकडे, विराटने धावफलक हलता ठेवण्यावर अधिक भर दिला असताना दुसरीकडे, रोहितने मात्र इंग्लंडच्या जवळपास प्रत्येक गोलंदाजावर तुटून पडण्यात काहीही कसर सोडली नाही. मॉर्गनने या लढतीत देखील फिरकीपटू अदिल रशिदकडे नवा चेंडू सोपवण्याची चाल रचली. पण, यातून त्यांना फारसे काही साध्य करता आले नाही. रशिदचे या सामन्यातील गोलंदाजी पृथक्करण 4 षटकात 31 धावात 1 बळी असे राहिले.
पॉवर प्लेमध्ये 60 धावा
विराट-रोहितच्या तोडफोड फलंदाजीमुळे भारताने 6 षटकांच्या पहिल्या पॉवरप्लेमध्ये 10 च्या सरासरीने 60 धावा फलकावर लावल्या आणि नंतर आणखी आक्रमक पवित्र्यावर भर दिला. प्रारंभी, भारताने 32 चेंडूतच पहिले अर्धशतक साजरे केले होते. नंतर मुंबईकर रोहितने 32 चेंडूत आपले अर्धशतक नोंदवले तर विराटनेही 36 चेंडूत हा माईलस्टोन साजरा
केला.
भारताने 150 धावांचा टप्पा 14.4 षटकात तर 200 धावांचा टप्पा 18.2 षटकात पार केला. इंग्लंडला या लढतीत पहिले यश प्राप्त करण्यासाठी 9 व्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत प्रतीक्षा करावी लागली.
अष्टपैलू स्टोक्सने प्रतितास 117 किमी वेगाने टाकलेल्या लेगकटरवर रोहितचा अंदाज चुकला आणि त्याचा त्रिफळा उडाला होता.
सुर्यकुमारची आक्रमक फलंदाजी
सुर्यकुमार यादवने या लढतीत देखील आक्रमक फलंदाजी साकारताना 17 चेंडूतच 32 धावांची आतषबाजी केली. पुढे तो 14 व्या षटकात रशीदच्या गोलंदाजीवर रॉयकडे झेल देत बाद झाला. अर्थात, इंग्लंडसाठी हे डावातील शेवटचे यश ठरले होते.
त्यानंतर विराटने हार्दिक पंडय़ाच्या साथीने तिसऱया गडय़ासाठी 81 धावांची अभेद्य भागीदारी साकारली आणि संघाला 2 बाद 224 धावांपर्यंत मजल मारुन दिली. इंग्लंडतर्फे रशिदशिवाय, केवळ बेन स्टोक्सला 26 धावात 1 बळी घेता
आला.
नटराजनला संधी
भारताने या लढतीसाठी एक अतिरिक्त गोलंदाज खेळवण्याच्या उद्देशाने खराब फॉर्ममधील केएल राहुलला डच्चू दिला आणि युवा जलद गोलंदाज टी. नटराजनला संधी दिली.
जेव्हा कर्णधार विराट सलामीला फलंदाजीला उतरतो!
इंग्लंडने या मालिकेत चौथ्यांदा नाणेफेक जिंकल्यानंतर अपेक्षेप्रमाणे भारताला प्रथम फलंदाजीला पाचारण केले. मात्र, यावेळी सलामीला बढतीवर आलेल्या विराट कोहलीने रोहितच्या साथीने इंग्लिश गोलंदाजांवर चांगलाच हल्ला चढवला. मुळात, विराटने सलामीला उतरेल, याची कल्पना कोणालाच नव्हती. मात्र, भारताने येथे केएल राहुलला वगळले आणि रोहित-विराट ही जोडी सलामीला उतरली. ही रणनीती उत्तम फळली असल्याचे विशेषतः पॉवर प्लेच्या षटकात सुस्पष्ट झाले.