4 ते 6 महिन्यांमध्ये निकाल मिळण्याची अपेक्षा
कोरोना विषाणूच्या विरोधातील लढाईत चांगले वृत्त हाती लागले आहे. देशातच कोरोना विषाणूच्या लसीचा प्राण्यांवरील प्रयोग सुरू झाला आहे. या प्रयोगाचा निष्कर्ष प्राप्त होण्यास 4 ते 6 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. गुजरातमधील जायडस कॅडिला कंपनी ही लस तयार करत आहे. याच कंपनीने 2010 मध्ये देशात स्वाईन फ्लूची सर्वात पहिली लस तयार केली होती.
कोरोना विषाणूकरता लस तयार करत असल्याची माहिती कंपनीने मार्च महिन्यातच दिली होती. कोरोनाच्या लसीवर काम करत आहोत. लसीच्या चाचणीकरता मोठा वेळ लागत असला तरीही यात यश मिळण्याची अपेक्षा असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शर्विल पटेल यांनी सांगितले आहे. हिवतापाच्या उपचारात प्रभावी मानल्या जाणाऱया हायड्रीक्सी क्लोरोविक्नचे भारतात सर्वाधिक उत्पादन इप्का लॅबोरेटीज आणि जायडस कॅडिलाकडून घेतले जाते. औषधनिर्मिती क्षेत्राच्या जाणकारांनुसार भारतात हायड्रॉक्सी क्लोरोक्विनच्या एकूण उत्पादनात या दोन्ही कंपन्यांची भागीदारी 80 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. जायडस कॅडिला दर महिन्यात 20 टन हायड्रॉक्सी क्लोरोक्विन निर्माण करू शकते.
उत्पादन वाढविणार
सरकारने औषध कंपन्यांना हायड्रॉक्सी क्लोरोक्विनचे उत्पादन आणि याचा पुरवठा निश्चित करण्यास सांगितले आहे. सरकारकडून हायड्रॉक्सी क्लोरोक्विनच्या 10 कोटी टॅबलेट निर्माण करण्याची ऑर्डर जायडस आणि इप्का लॅबोरेटीज यासारख्या कंपन्यांना देण्यात आली आहे. एवढय़ा टॅबलेट 50 ते 60 लाख कोरोनाबाधितांच्या उपचारांसाठी पुरेशा आहेत. याचबरोबर होणारे उत्पादन अमेरिकेसह अन्य देशांमध्ये निर्यात केले जाऊ शकते.
चीनवर अवलंबून नाही
चीनमधील कोरोना संकटामुळे भारतीय औषधनिर्माता कंपन्या चिंतेत पडल्या आहेत. अनेक कंपन्या कच्च्या मालासाठी चीनवर बऱयाच प्रमाणात अवलंबून आहेत. परंतु जायडस कॅडिलाचे व्यवस्थापकीय संचालक शर्विल पटेल यांनी कंपनी चीनवर मोठय़ा प्रमाणात निर्भर नसल्याचे सांगितले आहे.









